पुणे : सहकारनगर येथील अरण्येश्वर परिसरात वाहनांची तोडफोडकरून दहशत पसरवणाऱ्या सिद्धार्थ गायकवाडसह त्याच्या १६ साथीदारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्हेगारांवर कारवाई
दरम्यान, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्काची ही ३६ वी कारवाई आहे. टोळीप्रमुख सिध्दार्थ विजय गायकवाड (वय २२) त्याच्यासह राम राजाभाऊ उमाप, सनी उर्फ किरण कैलास परदेशी, अमोल उर्फ नाना जालिंदर बनसोडे, समीर रज्जाक शेख, राजाभाऊ उर्फ जटाळ्या लक्ष्मण उमाप, गणेश उर्फ भुषण कैलास परदेशी, नब्बा उर्फ नरेश सचिन दिवटे, हर्षद अप्पा ढेरे, शुभम उर्फ डुई अनिल ताकतोडे, विशाल शिवाजी पाटोळे, चेतन कांबळे, गौरव नाईकनवरे यांच्यासह दोन विधिसंर्घीत बालकांवर मोक्काची कारवाई केली आहे. सिद्धार्थ गायकवाड व दत्ता जाधव यांच्यात वाद असून, त्यांच्या टोळ्यात कायम धुसफूस सुरू असते.
मागील भांडणाची किनार वाहनांच्या तोडफोडीला
यादरम्यान, लहुजी शक्ती सेना चौकात गायकवाड याने जाधव याच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर वाहनांची तोडफोड केली होती. घटनेत गुन्हा नोंदकरून १३ जणांना अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील यांच्याकडे मोक्काचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानूसार आयुक्तांनी मोक्का कारवाई केली.