धक्कादायक ! 4 वर्षांच्या मुलीला रेल्वे स्थानकात सोडून आई गेली पळून; सीसीटीव्ही पाहताच...(iStock Photo)
नागपूर : एका 4 वर्षाच्या मुलीसाठी आई म्हणजे सर्वस्व. परंतु एका निरागस बालिकेला सोडून आई निघून गेली. आई दिसत नसल्याने मुलगी रडून बेजार झाली. ‘माझी आई कुठे गेली, कधी परत येईल’, असे ती सारखी विचारते. तिची आई रेल्वे स्थानकाहून रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. ती दिल्लीमार्गे निघाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले. लोहमार्ग पोलिस मोबाईल लोकेशन मिळवून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
हुडकेश्वर ठाण्यांतर्गत राहणारी 31 वर्षीय महिला 9 जून रोजी रेल्वे स्थानकाहून बेपत्ता झाली. लोहमार्ग पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. गुन्हा दाखल करून महिलेचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले आहे. रेणुका (काल्पनिक नाव) असे त्या महिलेचे नाव आहे. 10 वर्षांपूर्वी रेणुकाचे लग्न झाले. पती वेल्डिंगचे काम करतो. तिला चार वर्षांची मुलगी आहे. त्यांची आर्थिक स्थिती पाहिजे तशी चांगली नाही, यावरून त्यांच्यात धुसफूस व्हायची.
9 जून रोजी रेणुकाने मुलीला खाऊ घातले आणि दुपारी दुचाकीने निघाली. रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी ठेवली. स्थानकाच्या आत जात असताना तिने पतीला व्हॉट्सअॅप कॉल केला. मी चालली, रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी ठेवली आहे. असे सांगून तिने फोन कट केला. पती धावपळ करत घरी पोहोचला. मुलीची विचारपूस केली. आई घरी परतलीच नाही, असे सांगताच त्याने थेट रेल्वे स्थानक गाठले.
युवकासोबत पळून गेल्याचा संशय
या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार ऋषिकांत राखुंडे यांच्याकडे दिला. राखुंडे यांनी त्वरित सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रेणुका रेल्वेस्थानकाच्या आत जाताना दिसली. नंतर फलाट क्रमांक एकवर दिल्लीकडे जाणाऱ्या तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये ती बसताना दिसली. राखुंडे यांनी रेणुकाविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. त्यानुसार, पोलिसांकडून तपास केला जात आहे.