BEST Bus : भांडुपमध्ये बेस्ट बससेवेचा बोजवारा; तासनतास प्रतीक्षा, खच्चून गर्दी; प्रवाशांचे हाल, तरीही प्रशासन ढिम्म्!
नीता परब, मुंबई
भांडुप पश्चिम परिसरातील बेस्ट बससेवेचा (BEST Bus) प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याप्रश्नी निवेदन देऊनही त्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पाटील यांनी प्रवाशांच्या समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाला जाब विचारला आहे.
दरम्यान, या भांडुप पश्चिममधील बस क्रमांक ३०७, ५२२, ६०५, ६०६ आणि ४२८ या मार्गांवरील बससेवा सुरळीत करण्याची मागणी वारंवार करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे सातत्याने समोर येत आहे.
त्यामुळे बेस्ट प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सकाळच्या गर्दीच्या वेळेत बसची अपुरी संख्या, तासनतास प्रतीक्षा आणि बसमध्ये होणारी प्रचंड गर्दी यामुळे नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.
भांडुप पश्चिम हा मुंबईतील वर्दळीचा परिसर असून येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बस क्रमांक ३०७, ५२२, ६०५, ६०६ आणि ४२८ या मार्गांवरील फेऱ्या अनियमित असल्यामुळे उपलब्ध बसवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण पडत आहे.
परिणामी, एकाच बसमध्ये प्रवाशांना अक्षरशः खच्चून भरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाच्या अपेक्षेला हरताळ फासला जात असल्याचे स्पष्टपणे जाणवते. विशेषतः सकाळी ६ ते ७.३० या गर्दीच्या वेळेत बसची संख्या अत्यंत अपुरी असल्याने प्रवाशांना अनेकदा एक ते दोन तास किंवा त्याहून अधिक काळ बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे राजोल पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
या समस्यांबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही बेस्ट प्रशासनाकडे लेखी निवेदने आणि ई-मेलद्वारे तक्रारी केल्या आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत बदल झालेला नसल्याने प्रवाशांच्या समस्यांकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते, याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत राजोल पाटील यांनी अधिकाऱ्यांना आधीच्या निवेदनावर झालेल्या कार्यवाहीची माहिती मागितली आणि बससेवा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.
याशिवाय, बस क्रमांक ३०७ च्या अनेक फेऱ्या गांधीनगर किंवा मंगतराम पेट्रोल पंप येथेच कमी अंतराच्या म्हणून थांबविल्या जात असल्याने भांडुप पोलीस ठाणे, भांडुप रेल्वे स्थानक परिसर आणि पुढील भागात जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त प्रतीक्षा व गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कमी अंतराच्या बसफेऱ्या भांडुप पोलीस ठाण्यापर्यंत चालविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. बस क्रमांक ६०५, ६०६ आणि ४२८ च्या फेऱ्या नियमित करणे, गर्दीच्या वेळेत बसची संख्या वाढविणे, सर्व संबंधित मार्गांवरील सेवा सुरळीत करणे आणि कमी अंतराच्या फेऱ्या भांडुप पोलीस ठाण्यापर्यंत सुरू करणे, या प्रमुख मागण्या पाटील यांनी बैठकीत मांडल्या. यावर बेस्ट प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.
Ans: बसफेऱ्या अनियमित असणे, गर्दीच्या वेळेत बसची संख्या कमी असणे आणि प्रवाशांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणे, या प्रमुख समस्या आहेत.
Ans: बस क्रमांक ३०७, ५२२, ६०५, ६०६ आणि ४२८ या मार्गांवरील सेवा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Ans: गांधीनगर किंवा मंगतराम पेट्रोल पंप येथेच थांबवल्या जाणाऱ्या कमी अंतराच्या बसफेऱ्या भांडुप पोलीस ठाण्यापर्यंत चालविण्याची मागणी करण्यात आली आहे.






