
Mahesh sawant Dadar
मुंबई : राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून आता पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनीही या नामांतराला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे दादरच्या नामांतराचा मुद्दा आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. (Dadar Station Renaming)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांनी दादरचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चैत्यभूमीबद्दल आपल्या मनात नितांत आदर आहे, मात्र दादर या पारंपरिक नावालाही वेगळे महत्त्व आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारची ही खेळी असून त्याला बळी पडू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. सर्वसामान्य दादरकरांना हे नामांतर मान्य होणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. या विषयावरून राजकीय वाद निर्माण होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याआधी मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनीही या प्रस्तावाला विरोध केला होता. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत स्थानिक दादरकरांना विश्वासात न घेतल्याचा आरोप केला.
यशवंत किल्लेदार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले कि, ‘दादरचं नाव बदलताना दादरकरांचं मत विचारात घेतलं गेलं नाही… बाहेरच्या लोकांनी केलेल्या मागणीला दादरकरांवर थोपवत दादरकरांची ओळख पुसण्याचं काम सुरु आहे. तीव्र निषेद!’ किल्लेदार यांनी नंतर हि पोस्ट डिलीट केली असून सध्या सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ नोव्हेंबर रोजी दादर स्थानकाच्या नामांतराबाबत माहिती दिली. राज्य सरकारने दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्यास तत्त्वतः मान्यता दिली असून, केंद्र सरकारकडे यासंदर्भात पत्रव्यवहारही केला आहे.
केंद्राच्या मार्गदर्शनानुसार विधिमंडळ समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रिया आगामी हिवाळी अधिवेशनात पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर नामकरणाची पुढील कार्यवाही होईल.
एका बाजूला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीला पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे दादरची पारंपरिक ओळख कायम ठेवण्याची मागणीही पुढे येत आहे. त्यामुळे या प्रस्तावावर स्थानिक नागरिकांची मते आणि राजकीय पक्षांच्या भूमिका काय असतील, याकडे लक्ष लागले आहे. हिवाळी अधिवेशनात सरकार कोणती पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ans: मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. याला सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे.
Ans: मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि शिवसेना (ठाकरे गट) आमदार महेश सावंत यांनी या नामांतराला विरोध दर्शवला आहे.
Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माहितीनुसार, डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक विधिमंडळीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.