पुणे दहीहंडी (फोटो- सुनयना सोनवणे)
पुणे शहरात पाहायला मिळाला दहीहंडीचा जल्लोष
शुक्रवारी कृष्णाअष्टमीच्या रात्री श्रीकृष्ण जन्मसाेहळा पडला पार
स्पीकरच्या भिंती कायम , पण आवाजववर नियंत्रण
सुनयना सोनवणे /Pune Dahi Handi 2026: ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद आणि डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईने शनिवारी (दि. ५) शहरातील दहीहंडी उत्सवाला रंगत आणली. सायंकाळनंतर विविध भागांत गोविंदा पथकांची गर्दी वाढत गेली. पारंपरिक ढोल-ताशांसह आधुनिक संगीताची जोड, आकर्षक सादरीकरणे आणि एलईडी (Pune) स्क्रीनमुळे उत्सवाचे वातावरण अधिकच जल्लोषमय झाले. यंदा ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर मर्यादा असल्याने अनेक ठिकाणी ढोल-ताशांचा नाद अधिक ठळकपणे ऐकू आला.
सायंकाळपर्यंत शहरात तुलनेने शांत वातावरण होते. मात्र, त्यानंतर गोविंदा पथके गाड्या आणि टेम्पोंमधून विविध मंडळांच्या दहीहंडीच्या ठिकाणी दाखल होऊ लागली. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. सुवर्ण तरुण युग मंडळ, मानाची पहिली हुतात्मा बाबू गेनू मंडळाची दहीहंडी, विश्रामबाग वाडा दहीहंडी, अकरा मारुती चौक, खजिना विहीर, माती गणपती मंडळाची संयुक्त डीजेमुक्त दहीहंडी, बाल विकास मंडळ, श्रीकृष्ण मंडळ, धक्या मारुती मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ आणि गुरुजी तालीम मंडळासह विविध ठिकाणी उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली.
Dahi Handi : दहीहंडीच्या उत्सवाला नशामुक्त महाराष्ट्राची जोड; फडणवीसांचे गोविंदा पथकांना आवाहन
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ढोल-ताशा पथकांची संख्या अधिक असल्याचे चित्र दिसले. काही ठिकाणी ढोल-ताशांच्या तालावर गोविंदा पथके आणि तरुणाईने ठेका धरला, तर काही मंडळांनी डीजेची व्यवस्था केली होती. ‘पाखरा आझाद केलं तुला’, ‘काळू बाईच वार’, ‘ब्रिंग इट ऑन’, ‘तिरची टोपीवाले’, ‘पाटलांचा बैलगाडा’, ‘नटीनं मारली मिठी’, ‘आम्ही गड्या छत्रपती शिवबापाचे’ अशा विविध गाण्यांवर तरुणाई जल्लोष करताना दिसली.
दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांमध्येही मोठा उत्साह होता. काही ठिकाणी लहान मुलांना खांद्यावर बसवून पालक उत्सवाचा आनंद घेताना दिसले. मोबाईलवर दहीहंडी, गोविंदा पथकांचे नृत्य आणि ढोल-ताशांचे क्षण टिपण्याची नागरिकांमध्ये मोठी ओढ होती. अनेकांनी फोटो आणि चित्रफिती तातडीने समाजमाध्यमांवरील ‘स्टोरी’वर शेअर केल्या.
माती गणपती मंडळासह काही मंडळांनी संयुक्तपणे डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन केले. या ठिकाणी ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे एका बाजूला डीजेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष, तर दुसऱ्या बाजूला पारंपरिक वाद्यांच्या निनादात साजरा होणारा उत्सव, असे दोन्ही रंग पुण्यात पाहायला मिळाले. महाकाल नृत्य, विविध सांस्कृतिक सादरीकरणे आणि मोठ्या एलईडी स्क्रीनवरील चित्रफितींनीही उत्सवात रंग भरला. दहीहंडीच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढत असताना मोबाईलच्या कॅमेऱ्यांचीही लगबग सुरू होती.
साउंडचा आवाज कमी; ढोल-ताशांचा नाद घुमला!
यंदा ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर मर्यादा असल्याने दहीहंडी उत्सवात पारंपरिक ढोल-ताशांचा नाद अधिक ठळकपणे जाणवला. हुतात्मा बाबू गेनू मंडळ, नारायण पेठ माती गणपती मंडळ, अखिल बुधवार पेठ दहीहंडी, बाल विकास मंडळ, धक्या मारुती मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ आणि गुरुजी तालीम मंडळ आदी परिसरांत ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.






