
Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा
सवलतीच्या तिकिटासाठी आजपासून एसटीमध्ये NCMC कार्ड बंधनकारक; कार्ड नसेल तर सवलत नाही
सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन मतदार यादीमध्ये ५ लाख १४ हजार ९५५ मतदार नोंदवले गेले होते. त्यानंतर झालेल्या प्रशासकीय छाननी व पडताळणी प्रक्रियेत २ लाख १३ हजार ४५ मतदारांच्या नोंदी कायमस्वरूपी वगळण्यात आल्या, असा दावा त्यांनी केला. याशिवाय ४७ हजार ९०१ मतदारांचे मॅपिंग अद्याप प्रलंबित असून, त्यांची सुनावणी व खातरजमा केली जाणार आहे. तर ४८ हजार ३७९ मतदारांच्या नोंदींमध्ये तांत्रिक विसंगती आढळल्याचेही त्यांनी सांगितले. या आकडेवारीमुळे मिरा-भाईंदरमधील मागील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे सरनाईक यांनी म्हटले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या नोंदींमध्ये त्रुटी कशा निर्माण झाल्या? त्या वेळी त्यांची योग्य पडताळणी का झाली नाही? प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेने याकडे दुर्लक्ष का केले? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
सरनाईक यांनी या प्रकरणाकडे केवळ प्रशासकीय त्रुटी म्हणून न पाहता त्यामागे राजकीय कारस्थानाची शक्यताही तपासण्याची गरज व्यक्त केली. मतदार यादीतील नोंदींच्या पडताळणीशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवली गेली असेल, तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. मागील महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाला झालेल्या पराभवाबाबतही सरनाईक यांनी यावेळी भाष्य केले. मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि प्रशासकीय गोंधळामुळे आपल्या पक्षाचा ‘तांत्रिक पराभव’ झाल्याचा दावा त्यांनी केला. अन्यथा निकाल वेगळा लागला असता, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे, सरनाईक यांनी केवळ निवडणूक यंत्रणा किंवा प्रशासनावर आरोप न करता आपल्या पक्षाच्या स्थानिक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले. इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदार याद्यांमध्ये कथित अनियमितता होत असताना स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या लक्षात ही बाब वेळेत यायला हवी होती. बोगस नोंदी रोखण्यात पक्षाच्या स्थानिक यंत्रणेकडूनही दुर्लक्ष झाले, हे नाकारता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. महापालिका आयुक्तांकडे यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, चौकशीच्या नावाखाली केवळ औपचारिकता करण्यात आली आणि ठोस कारवाई झाली नाही, असा आरोपही सरनाईक यांनी केला.
दरम्यान, मतदार याद्यांच्या मॅपिंग व पडताळणी प्रक्रियेत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. त्यानंतर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. २०१९ च्या मतदार यादीतील भाग क्रमांक ४८७ संदर्भातील आकडेवारीचाही सरनाईक यांनी उल्लेख केला. या भागातील ५ लाख ६७ हजार ९७२ मतदारांपैकी ५०.९९ टक्के मतदारांचे मॅपिंग प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये १ लाख ४२ हजार ६६२ आणि १ लाख ४८ हजार ४०७ अशा मोठ्या संख्येने मतदारांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातून धडा घेत पक्षाची स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे संकेत सरनाईक यांनी दिले. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची विशेष बैठक घेण्यात आली असून, मतदार याद्यांच्या हरकतींच्या कालावधीत कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खरा मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे, यासाठी पक्षाची विशेष टीम काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मतदार यादी ही कोणत्याही निवडणुकीचा अत्यंत महत्त्वाचा आधार असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नावे वगळली गेल्याचा दावा खरा असल्यास, त्याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. मतदारांची नावे कोणत्या निकषांवर वगळण्यात आली, त्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती का, मॅपिंगची प्रक्रिया कशी राबविण्यात आली आणि यातील त्रुटींना जबाबदार कोण, याबाबत स्पष्टता येणे गरजेचे आहे.
सरनाईक यांच्या आरोपांमुळे मिरा-भाईंदरच्या आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या तापण्याची शक्यता आहे. आता प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.