छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला लोकलखाली ढकलले; डावा हात गमावला, नायगाव स्थानकावरील सुरक्षा रामभरोसे!
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणारी लोकल नायगाव रेल्वे स्थानकात आली असताना आरोपीने तिच्या छातीजवळ हात लावून गैरवर्तन केले. तरुणीने याला विरोध करत आरोपीला चप्पल मारली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. लोकल फलाटावर थांबलेली असताना आरोपीने तरुणीला दोन्ही हातांनी जोरात धक्का दिला. त्यामुळे ती दोन डब्यांच्या मधून थेट रेल्वे रुळांवर पडली.
तरुणी फलाटावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल सुरू झाली. यावेळी तिचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान तिचा हात कोपरापासून कापावा लागला. या घटनेनंतर आरोपी गर्दीचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला होता.
या प्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११७(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, आरोपीने तरुणीला लोकलखाली ढकलल्याने खुनाच्या प्रयत्नाचे कलम १०९ लावण्यात यावे, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली.
या मागणीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. संबंधित प्रकरणात आवश्यक कलमे वाढवण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी जितेंद्र हिरमुखे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेनंतर नायगाव रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एवढी गंभीर घटना घडूनही स्थानकावर सुरक्षा रक्षक तैनात नसल्याचे दिसून येत असल्याने प्रवाशांकडून चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एका तरुणीला छेडछाडीला विरोध केल्याची मोठी किंमत मोजावी लागल्यानंतरही नायगाव स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था सुधारलेली नसेल, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Ans: ४ नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.
Ans: लोकल सुरू झाल्याने तरुणीचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आला. त्यामुळे तिचा हात कोपरापासून कापावा लागला.
Ans: या प्रकरणातील आरोपी जितेंद्र हिरमुखे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.






