
Parents Association : दिवेआगार घटनेनंतर पालक संघटना आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
या संपूर्ण घडामोडींवर मुंबईतील ग्लोबल पेरेंट्स टीचर असोसिएशनचे अध्यक्ष रोहित श्यामसुंदर दंडवते यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पानी पत्र पाठवले आहे. त्यांनी या पत्रात खासगी सहलींसाठी कठोर नियमावली (SOP) लागू करावी अशी मागणी केली आहे.
शाळा-महाविद्यालयांसाठी शिक्षण विभागाची कडक नियमावली असताना, लाखो रुपये फी घेणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या सहलींवर कोणाचेही नियंत्रण नाही. ही धक्कादायक बाब दै. प्रभात (दि. ३ ऑक्टोबर) ने उघडकीस आणली आहे.
रोहित दंडवते यांनी लिहिलेल्या पत्रात असे नमुद केले की, शाळा आणि महाविद्यालयांच्या सहलींसाठी शिक्षण विभागाकडून नियमावली लागू केली जाते, खाजगी कोचिंग क्लासच्या सहलींचे नियोजन, परवानगी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पुरेशी नियंत्रण व्यवस्था नसल्याचा मुद्दा दंडवते यांनी पत्रात उपस्थित केला. दिवेआगद येथील दुर्घटना आणि मुरूड येथील यापूर्वी झालेल्या 14 विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा उल्लेख करत त्यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे.
दिवेआगार दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कोचिंग क्लासचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संबंधित क्लासची मान्यता रद्द करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधितांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची गरजही पालक संटनेने अधोरेखित केली आहे.
तसेच खाजगी कोचिंग क्लासच्या सहलींसाठी स्वतंत्र आणि कडक एसओपी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. समुद्रकिनारे, धरणे आणि किल्ले यांसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित यंत्रणेची परवानगी घेणे बंधनकारक करावे अशी मागणीही ग्लोबल पेरेंट्स टिचर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन दंडवते यांनी केले आहे. येत्या 15 दिवसांत खाजगी कोचिंग क्लासच्या सहलींसाठी कडक एसओपी लागू न केल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
तसेच खाजगी क्लासच्या सहलींचे नियोजन करताना विद्यार्थ्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी स्पष्ट नियम, जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद असावी, अशी भूमिका ग्लोबल पेरेंट्स टीचर असोसिएशनने मांडली आहे.