चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा पालिकेवर आरोप
नवी मुंबई / सिद्धेश प्रधान : ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात रिचा मिश्रा आणि सोनम डोंगरे या दोन गर्भवती महिला प्रसूतीसाठी सोमवारी (दि.30) दाखल झाल्या होत्या. या दोन्ही महिला आठ महिन्यांच्या गर्भवती असल्याने त्यांचा गर्भधारणेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच प्रिमॅच्युअर प्रसूती होऊन त्यांच्या अर्भकाच्या प्रकृतीमध्ये दोष राहू नये याकरिता सर्वसाधारणपणे अशा गर्भवती महिलांना देण्यात येणारे इंजेक्शन त्यांना देण्यात आले होते.
या इंजेक्शननंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रूग्णालयात बुधवारी (दि.1) शिफ्ट करण्यात आले होते. मात्र, यामधील सोनम डोंगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच रिचा मिश्रा यांना यांना फोर्टीज रूग्णालयात शिफ्ट करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आयुक्तांनी पाच सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे.
तथापि, सोनम डोंगरे यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये सदर इंजेक्शनचे डोस तात्काळ थांबवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे सूचनेनुसार देण्यात आले आहेत. इंजेक्शन्सची तपासणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे हे वाशी सार्वजनिक रूग्णालयामध्ये उपस्थित असून, सर्व गोष्टींची बारकाईने माहिती घेत आहेत.
चौकशी समिती स्थापन
याबाबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमलेली असून त्यामध्ये जेजे रूग्णालयाचे विभागप्रमुख, नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ सोसायटीचे सदस्य आणि नमुंमपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे सदस्य असणार आहेत. ही समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून या समितीस सत्वर सविस्तर अहवाल सादर करण्याचे सूचित करण्यात येत आहे.
आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या दोन्ही घटनांकडे अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहिले जात असून, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी चौकशीचे व कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत.






