मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
मुंबई हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टदरम्यान कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरातील परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो उमेदवार परीक्षेसाठी दाखल झाले होते. मात्र, परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा केंद्रावर सीटींग व्यवस्थेचे योग्य नियोजन नव्हते. उमेदवारांची तपासणी आणि मार्गदर्शनासाठीही स्पष्ट व्यवस्था नसल्याने सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेक संगणक धुळखात पडलेले होते, तर काही संगणक सुरूच होत नसल्याने उमेदवारांना अर्धा तासांहून अधिक वेळ थांबावे लागले.
संगणक सुरू झाल्यानंतरही सर्व्हर प्रतिसाद देत नसल्याने टायपिंग टेस्ट सुरू होऊ शकली नाही. सकाळी 10 वाजताच्या सत्रातील उमेदवार केंद्रावर अडकले असतानाच सव्वा बारा आणि दुपारी 3 वाजताच्या सत्रातील शेकडो विद्यार्थीही केंद्रावर पोहोचल्याने गर्दी प्रचंड वाढली.
CA होण्यासाठी वयाची कोणतीही अट आहे का? जाणून घ्या कोणत्याही वयात सीए बनण्याची संपूर्ण प्रक्रिया!
परीक्षा खोळंबल्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर निषेध आंदोलन केले. दूरवरून आलेल्या उमेदवारांनी पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रार केली. या गोंधळामुळे पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, परीक्षा केंद्राचे संचालक संजय वानखेडे यांनी तांत्रिक अडचणीमुळे प्रिंट प्रक्रिया आणि परीक्षा वेळापत्रक उशिराने सुरू झाल्याचे सांगितले. समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला असला, तरी विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी संबंधित प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.