राज्यात 15 हजार PSI पदाची भरती केली जाणार; पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची माहिती
मुंबई : राज्य पोलिस दलातील सुमारे 23 हजार रिक्त पदांपैकी 15 हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, सध्या दलात पोलिस उपनिरीक्षकांची (फौजदार) पदे रिक्त आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतानाच कार्यरत पोलिसांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी फौजदारांची पदभरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी गुरुवारी दिली.
आयुक्तालयात शहर पोलिस दल आणि परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्व घटक प्रमुखांनी पीपीटीद्वारे आपापल्या दलाच्या कामगिरीचे सादरीकरण केले. बाजू समजून घेत महासंचालकांनी ‘बेसिक पोलिसिंग’च्या चौकटीत राहून कर्तव्य बजावण्याच्या सक्त सूचना दिल्या. गुन्ह्यांचा तपास, पुरावे संकलन आणि वेळेत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्याचे आदेश त्यांनी दिले.
तसेच अधिकाऱ्यांपासून अंमलदारांपर्यंत अचूक फायरिंगचे उपक्रम राबवणे, प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर, प्रभावी सिग्नल यंत्रणा आणि स्वयंशिस्तीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, दिल्लीच्या एका आंदोलनापूर्वी अभिजीत दीपके यांनी त्यांच्या कुटुंबाविषयी चिंता व्यक्त करताच त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे महासंचालकांनी नमूद केले.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू
शासनाच्या वरिष्ठ स्तरावरील निर्णयानुसार, आंदोलनावेळचे गुन्हे मागे घेण्याची कारवाई सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही पोलिसांचे बारकाईने लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सायबर तपासासाठी 850 कोटींचा निधी
वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी पोलिस दलात आयटी तज्ज्ञ, सायबर सुरक्षा सल्लागार आणि डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. तसेच कार्यरत पोलिसांना कृत्रिम बुद्धिमत्ता व तपासाचे प्रशिक्षण दिले जात आहे. ‘महासायबर’ प्रकल्पांतर्गत राज्याला ८५० कोटींचा निधी मंजूर असून, त्यातून सर्व पोलिस ठाण्यांत सायबर प्रशिक्षित अधिकारी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दाते म्हणाले.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिला भाड्याच्या घरात तब्बल २४ तास डांबून ठेवले होते. नग्न करून तिचे हात-पाय बांधले. तिला ठार मारण्याच्या उद्देशाने शरीराच्या विविध भागावर जखमा केल्या. तिच्यावर रात्रभर अत्याचार केला. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिवी सिनेस्टाईल सुटका केली.






