लोकलमध्ये महिलांच्या डब्यात मोबाइलचा स्फोट; प्रवाशांमध्ये घबराट (फोटो सौजन्य-X)
Mumbai Local News Marathi: मुंबई लोकलच्या महिला डब्यात प्रवास करताना अचानक मोबाईल फोनचा स्फोट झाला, ज्यामुळे डब्यात घबराट पसरली. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना सोमवारी रात्री ८:१२ वाजता कळवा स्थानकावर सीएसएमटी-कल्याण लोकल ट्रेनमध्ये घडली.
सीएसएमटी रेल्वे नियंत्रण कक्षाच्या प्राथमिक अहवालानुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, परंतु प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती, असे ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले.यावेळी मोटरमनच्या केबिनमधील गार्डने प्रसंगावधान राखत तातडीने अग्निरोधकाच्या सहाय्याने आग विझवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. ही रेल्वे काही वेळ कळवा स्थानकावर थांबवण्यात आली. सर्व सुरक्षित असल्याची खात्री केल्यावर ही लोकल कल्याणकडे पुन्हा रवाना करण्यात आली.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, मोबाईल स्फोटानंतर संपूर्ण डब्यात धुर पसरला होता. घाबरलेले प्रवासी ताबडतोब दाराकडे धावले आणि ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करू लागले. रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
पोलिसांनी सांगितले की,ज्या महिलेचा मोबाईल फोन स्फोट झाला त्यांची ओळख अजूनही पटलेली नाही. घटनेची चौकशी सुरू आहे. बॅटरीमधील काही बिघाडामुळे स्फोट झाला असावा. या घटनेनंतर, पोलिसांनी सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेचा रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.
यापूर्वी खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला होता. तर एक गंभीर जखमी झाला होता. भंडारा जिल्ह्यातील सिरेगाव टोला इथं ही घटना घडली होती. सुरेश संग्रामे असं मृत मुख्याध्यापकाचं नाव आहे. ते नत्थु गायकवाड यांच्यासोबत दुचाकीवरुन जात असताना अचानक त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या कपड्याला आग लागली. यात ते भाजले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र नत्थु गायकवाड हा देखील गंभीर जखमी झाला आहे.






