"आता आश्वासन नको...", आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
राहिवाश्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची असून आम्ही सहकार्याला तयार असल्याचं एकता संघाने जाहीर केले आहे. पण घरं परत कधी मिळणार? पुनर्विकास नेमका कधी सुरू होणार? सर्वांना हक्काचं घर मिळणार का? पुनर्विकास पूर्ण होई पर्यंत भाड मिळणार ना? या प्रश्नांची ठोस स्पष्ट उत्तरेच प्रशासनाकडे मागितली आहेत. पगडी एकता संघ एका पण रहिवाशावर अन्याय होऊ देणार नाही! या एकत्र आवाज उठवा हक्कासाठी लढा! असे आव्हान मुंबईतील समस्त पागडीधारकांना एकता संघाने आयोजित केलेल्या आंदोलनात केले आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची बकाल अवस्था झाली आहे. दक्षिण मुंबईतील १३८०० चाळींच्या दुरावस्थेकडे पाहिल्यावर त्यांची बिकट अवस्था दिसून येते. मूळ मुंबईकर मतदारांना गृहीत धरून निवडणुक काळात फक्त पोकळ आश्वासने देऊन फसवणूक केली जात आहे. एकीकडे मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडत आहेत तर दुसरीकडे राहते चाळीतले आमचे घर झोपडीपेक्षाही जास्त जर्जर व दुरावस्थेत असल्याची भावना पगडी धारक रहिवाश्यांनी व्यक्त केली आहे.
जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत. तसेच नवीन GR काढून पागडी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही अशी घोषणा यावेळी करण्यात आली. सरकारने पगडी धारकांना लवकरात लवकर न्याय द्यावा नाहीतर यांपुढेचे आंदोलन आझाद मैदानात नाही, तर रस्त्यावर उतरून केले जाईल असा इशारा पगडी एकता संघाचे अध्यक्ष मुकेश शाह पेंडसे यांनी दिला आहे .यावेळी सचिव विनिता राणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केली आहे.






