नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच बैठक तसेच आंदोलनाला पाठ दाखवणाऱ्या प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना सोमवारी राष्ट्रीय अध्यक्षाने तडकाफडकी पदमुक्त केले. या आदेशाने राज्यातील युवक काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या सर्वांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला आहे.
काँग्रेस श्रेष्ठींकडून पदमुक्त करण्यात आलेल्यांमध्ये अनेक बड्या नेत्यांचे पुत्र व मुलींचा समावेश आहे. शिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे, अनुराग भोयर यांचाही समावेश आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी अजय छिकारा, सहप्रभारी कुमार रोहीत यांनी यासंदर्भातील कारवाईचे पत्र जारी केले. दरम्यान, रविवारी युवक काँग्रेसतर्फे झालेली बैठक व सरसंघचालकांविरोधातील आंदोलनाला या सर्वांनी पाठ दाखविली होती, हे विशेष.
प्रदेश युवक काँग्रेसची देवडिया काँग्रेस भवनात बैठक रविवारी झाली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष उदयभान चिब यांच्यासह राष्ट्रीय महासचिव व प्रदेश प्रभारी अजय छिकारा, सहप्रभारी कुमार रोहीत, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीनंतर भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ अचानक आंदोलनाचा निर्णय घेतला होता.
देवडियातील बैठक आटोपताच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बाहेर पडले. या सर्वांनी देवडियाबाहेर घोषणाबाजी केली. त्यानंतर संघ मुख्यालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत, अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश
पदमुक्त करण्यात आलेल्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्ष तन्वीर विद्रोही, महासचिव अक्षय गुजर, शिवानी वडेट्टीवार, पंकज सावकर, आमीर शेख, केतन ठाकरे, अनुराग भोयर, डॉ. मेघा सव्वालाखे, सचिवांमध्ये सतीश वारजूरकर, सागर चव्हाण, अक्षय हेटे, तौसिफ अहमद, रिजवान बेग, रोशन मेश्राम, अभिषेक धवड, अंकुश मुंजेवार, मंगेश डाखोळे, रौनक चौधरी, शुभम गिरडकर, मयंक देशमुख, हेमंत कातुरे, स्नेहा सातपुते, नागपूर ग्रामीण अध्यक्ष मिथीलेश कन्हेरे, पूर्व पूर्व नागपूरचे भावेश तलमले, सावनेरचे राजेश खंगारे, कामठीचे सलामत अली, काटोलचे विनोद नौकरीया, हिंगण्याचे फिरोज शेख, उमरेडचे गुणवंत मांढरे आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.