
नागपुरात DJ बंदीचा आदेश धाब्यावर; दहीहंडीत DJचा दणदणाट
Nagpur News : नागपुरात दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली असतानाच DJ बंदीच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी DJ वापराबाबत बंदीचे आदेश दिले असतानाही शहरातील बडकस चौकात दहीहंडी उत्सवात DJचा वापर करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी थर रचण्यास सुरुवात केली. यावेळी DJसोबत तीव्र प्रकाशाच्या लाईट्सचाही वापर करण्यात आला. विशेष म्हणजे, बडकस चौकात पोलीस उपस्थित असतानाच DJ वाजत होता.
आयोजकांनी सकाळपासूनच DJ लावण्याची भूमिका घेतली होती. संध्याकाळी दहीहंडीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर DJ सुरू करण्यात आला. आवाज नेहमीच्या तुलनेत कमी ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात असलं, तरी DJचा आवाज परिसरात ऐकू येत होता.
पोलिसांकडून आवाजाच्या पातळीची नोंद घेतली जात होती. सायंकाळी सातच्या सुमारास 80 ते 82 डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे बंदीच्या आदेशानंतरही DJचा वापर केल्याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागलं आहे.
DJ बंदीच्या मुद्द्यावर भाजपमधूनही वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. माजी आमदार संदीप जोशी यांनी DJवरील बंदी कायमस्वरूपी असावी, अशी भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही केवळ त्यांची वैयक्तिक भूमिका नसून सर्वसामान्य नागरिक, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांच्या हिताची भूमिका आहे. जोशी यांनी काही गणेशोत्सव मंडळांनी DJ न वापरण्याबाबत हमीपत्र दिल्याचाही दावा केला आहे.
दुसरीकडे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी DJ बंदीला विरोध केला आहे. हिंदूंच्या सणांच्या वेळीच DJवर बंदी का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Nagpur News : नागपुरात डीजे बंदीचा कडकडाट; आदेशावरून वातावरण तापले
नागपुरातील बडकस चौकात पोलिसांची उपस्थिती असतानाही DJ सुरू असल्याने आता प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आवाजाची मर्यादा, बंदीचे आदेश आणि धार्मिक उत्सव यामध्ये समन्वय साधताना पोलीस कोणती भूमिका घेतात, याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे.