फोटो सौजन्य सोशल मीडिया
परिणामी शहरातील विविध भागांत पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, याबाबतही नागरिकांना स्पष्ट माहिती मिळत नाही. त्यामुळे जलसंकटाच्या या परिस्थितीत मनपा प्रशासन नेमके कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहराची जलवितरण व्यवस्था खासगी कंपनीकडे सोपवल्यानंतर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाची भूमिका नेमकी काय, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यानंतर नागरिकांना त्याची कारणे आणि पाणी कधी सुरू होणार, याची माहिती मिळणणे अपेक्षित आहे, मात्र, संबंधित अधिकाऱ्याकडून समाधानकारक माहिती दिली जात नसल्याचे चित्र आहे.
एखाद्या अधिकाऱ्याकडे विचारणा केल्यास अधिकार दुसऱ्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडे असल्याचे सांगितले जाते. त्या अधिका-यांकडे गेल्यास कार्यकारी अभियंत्याकडे पाठविले जाते. एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्याऱ्यांमध्येच समन्वय नसल्याचे या प्रकारातून दिसून येते.
पैच-४ जलशुद्धीकरण केंद्रातील पाईपलाईन स्थलांतराच्या कामासाठी बंद केलेला जलपुरवठा निर्धारित ३६ तासांनंतरही पूर्ववत होऊ शकला नाही. विश्व बैंक प्रकल्पांतर्गत करण्यात येणारे काम वेळेत पूर्ण न झाल्याने जलपुरवठा बंद ठेवण्याचा कालावधी वाढवावा लागला. त्यामुळे शहरातील प्रभावित भागांमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मनपाकडून शुक्रवारपासून टप्याटप्याने जलपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. महापौर नीता ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देऊन लवकरात लवकर जलपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा उपमहापौर लीला हाथीबेड यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
आचारसंहितेमुळे शहरातील अतिआवश्यक कामावर कोणतीही बंदी नसते. मग हजारो नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे यापेक्षा महत्त्वाचे काम कोणते, असा सवाल उपस्थित होत आहे. मनपा प्रशासनाने पदाधिका-यांच्या निर्देशांची वाट पाहण्याऐवजी आपत्कालीन परिस्थितीत स्वत हुन निर्णय घेणे गरजेचे आहे.
मात्र, शहरात अचानक निर्माण होणाऱ्या समस्यांवरही अधिकारी स्वतः हुन पुढाकार घेत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गुरुवारी अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः देवाच्या भरवशावर राहावे लागले.






