
फोटो सौजन्य सोशल मीडिया
विश्वनाथ कठाणे (४०, रा. गोंदिया) आणि मुकेश निषाद (रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) अशी मृत कामगारांची नावे आहेत. मंतुराम (२६, रा. छत्तीसगड) आणि महेश मिस्त्री हे जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळी एकच खळबळ उडाली.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे बांधकामस्थळी कामगार कामावर रुजू झाले होते. सकाळी सुमारे १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान बांधकामासाठी वापरण्यात येणारी ४० मीटर उंच क्रेन उभी करण्याचे काम सुरू होते. याचवेळी अचानक क्रेनचा तोल गेला आणि ती एका बाजूला झुकत थेट खाली कोसळली.
क्रेन खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडल्याने ही दुर्घटना घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कामगारांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. या प्रकल्पाचे कंत्राट बी. जे. शिर्के कंपनीला देण्यात आले असून, दुर्घटनेच्या वेळी रामजी प्रजापती हे क्रेन चालवत होते.
Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या ढिगाऱ्यात २६ वर्षीय मंतुराम अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष मोहीम राबवली. अग्निशमन अधिकारी सुनील डोकरे, भगवान वाघ, अकलीम शेख, विलास तिळगुळे आणि देवानंद शामकुळे यांनी घटनास्थळी बचावकार्य सुरू केले.
वाहनचालक गणेश राजुरकर आणि कंत्राटी अग्निशमन कर्मचारी नीलेश टेठे यांनी जीवाची पर्वा न करता क्रेनवर चढून अडकलेल्या कामगारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेचरच्या मदतीने मंतुराम यांना खाली उतरवून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य जखमींनाही उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स
या दुर्घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अधिकारी अतुल तावले यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. क्रेन कोसळण्यामागे नेमके कोणते तांत्रिक कारण होते, याचा शोध घेतला जात आहे.
तसेच बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, सुरक्षा मानकांचे पालन केले जात होते का, याचीही तपासणी सुरू आहे. या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळांवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.