सौजन्य : सोशल मीडिया
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत काही नेतेमंडळींना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण आता यातील काही नेतेमंडळींचे एकप्रकारे पुनर्वसन होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसारच, अनेक नेतेमंडळींना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी भाजपने केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने 10 नावे निश्चित केल्याची माहिती दिली जात आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे यांच्यासह चित्रा वाघ या सर्वांना विधान परिषदेवर पाठवले जाणार आहे. तसेच हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, माधवी नाईक यांचा या यादीत समावेश आहे.
दरम्यान, राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. भाजप आपल्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांना महायुती सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री बनवून ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा मोठा डाव खेळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन?
लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. अशातच विधान परिषदेच्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं हे राजकीय पुनर्वसन असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.