मुंबई : सध्या देशभर लोकसभा निवडणूकींचा रणधुमाळ चालू आहे. पुढील एका आठवड्यामध्ये लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. काल गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा झाला. यानंतर उद्धव ठाकरे व भाजप एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. यावर शिंदे गटातील बड्या नेत्याने दावा केला आहे.
महायुती सह महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र वाढले आहे. मात्र महाविकास आघाडीमधीलस ठाकरे गट भाजपमध्ये येणार असल्य़ाचे आमदाराने वक्तव्य केले आहे. शिंदे गटातील आमदाराने खात्रीशीर रित्या उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येतील असा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट होईल आणि ते भाजपासह येतील असा दावा छातीठोकपणे केला आहे. एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो. आपला अंदाज चुकणार नाही. असे वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.
पुढे आमदार शहाजीबापू म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार आहेत. आता फक्त दिवस कुठला ते बघावं लागेल. पण हे व्हावंच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही. पंतप्रधान मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावं लागण्याचा दिवस येणार आहे. लवकरच येणार आहे, राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळं वातावरण आहे. अशा वातावरणात जर उद्धव ठाकरेंनाही वाटलं की आपणही भाजपासह जावं तर त्यात गैर काही नाही.” महायुतीला लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मिळतील असाही दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.