आखातातील युद्धाचा टरबुजालाही फटका! येवल्यात कवडीमोल भाव; उत्पादकांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट
येवला : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही जाणवू लागला आहे. टरबूजाच्या निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याने स्थानिक बाजारपेठेत टरबूजाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने मागणीत सातत्याने घट होत आहे मागणी घटल्यामुळे टरबूजाचे चाजारभाव घसरले असून शेतकऱ्यांना कवडीमोल दरात माल विकण्याची वेळ आली आहे. परिणामी येवला तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर टरबूजाची लागवड केली होती. हंगामाच्या सुरुवातीला चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून लागवड केली.
पाण्याची व्यवस्था, मजुरी, खत-औषधे, प्लास्टिक मल्चिंग आणि वाहतूक यासाठी मोठा खर्च केला. हवामानही अनुकूल राहिल्याने उत्पादन चांगले झाले, मात्र बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. सध्या बाजारात टरबूजाची आवक प्रचंड वाढली असून टरबूजाला कमी भाव मिळत आहे. अनेक ठिकाणी टरबूजाला अत्यंत कमी भाव मिळत असून काही शांतक-यांना तर वाहतूक खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
टरबूज उत्पादक शेतकरी सचिन वाल्हेकर यांनी म्हटले आहे की, गंदा टरबूजाचे उत्पादन चांगले झाले असले तरी बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला असताना आता मालाला योग्य भाव मिळत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतीतील गुंतवणूक परत मिळणेही कठीण झाले असून शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, टरबूजाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, निर्यातीचे पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावेत तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून होत आहे. सध्याच्या परिस्थितीत टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, शासनाच्या मदतीची त्यांना प्रतीक्षा लागली आहे.






