
25 मोठे पूल, 7 नवी स्थानके बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला मिळणार गती (फोटो सौजन्य-ChatGPT)
मध्य रेल्वेच्या बांधकाम संघटनेने या प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्यासाठी 4,930.91 कोटी रुपयांची ईपीसी ई-निविदा जारी केली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
या निविदेअंतर्गत डॉ. आंबेडकर नगर (महू) ते ग्यासपूरखेडी या 72.66 किलोमीटर लांबीच्या रेल्वे विभागाचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामाची अंदाजित किंमत 4,930.91 कोटी रुपये आहे. कंत्राट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित एजन्सीला हे काम 48 महिन्यांत म्हणजेच चार वर्षांत पूर्ण करावे लागणार आहे.
या रेल्वे मार्गाचा काही भाग डोंगराळ परिसरातून जाणार असल्याने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. प्रस्तावित कामांमध्ये 25 मोठे रेल्वे पूल, अनेक छोटे पूल, चार रोड ओव्हर ब्रिज, एक बोगदा आणि उन्नत रेल्वे याडक्टचा समावेश आहे. 72.66 किलोमीटरच्या मार्गावर ग्यासपूरखेडी, चिक्त्यावाड, नीमगड, सराई तलाव, झाडी बडोदा, केलाउड आणि कामदपूर अशी सात नवीन रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत.
इंदूर-मनमाड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर माळवा-निमार प्रदेशाची महाराष्ट्रासह पुढे दक्षिण भारताशी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. खासदार शंकर लालवाणी यांनी या प्रकल्पामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना फायदा होईल तसेच रोजगाराच्या संधी वाढतील, असे म्हटले आहे.
विशेषतः कृषी उत्पादन आणि मालवाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो. रेल्वेचे थेट जाळे उपलब्ध झाल्यामुळे मालाची वाहतूक अधिक वेगाने होण्यास मदत होईल आणि लॉजिस्टिक्सवरील वेळ व खर्च कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इंदूरसह माळवा-निमारच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी हा रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.