उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला (Photo - X)
ठाणे : ठाण्याच्या मानपाडा परिसरात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या (Pradeep Purnekar Murder) झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेनंतर बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यामुळे भावुक वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका, असा सल्ला दिला.
उद्धव ठाकरे यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर, मुलगा राम पूर्णेकर आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी संवाद साधला. ‘सध्याच्या घडीला जे काही कराल ते शांत डोक्याने करा. भावनेच्या भरात कोणतंही पाऊल उचलू नका,’ असा सल्ला त्यांनी पूर्णेकर यांच्या मुलाला आणि भावाला दिल्याची माहिती आहे. तसेच, शेवटपर्यंत तुमच्या कुटुंबासोबत राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पूर्णेकर कुटुंबीयही भावूक झाले होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरी एकदा तरी यावं, अशी प्रदीप पूर्णेकर यांची इच्छा होती. ‘तुम्ही आज घरी आलात हे पाहून त्यांना आनंद झाला असता,’ अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
दरम्यान, या हत्या प्रकरणाच्या तपासाबाबतही कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंसमोर आपली भूमिका मांडली. या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि CBI चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
एफआयआरमध्ये काही नावांचा समावेश करण्यावरूनही पूर्णेकर कुटुंबीयांनी गंभीर दावा केला. “सुरुवातीला मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावं एफआयआरमध्ये नोंदवण्यास पोलीस तयार नव्हते. मात्र, संजय राऊत आल्यानंतर ही नावं एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली,” असा दावा कुटुंबीयांनी केला.
ठाणे महापालिका निवडणुकीतील कथित फेरफार आणि पैशांच्या वापराबाबतही पूर्णेकर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मात्र, या सर्व आरोपांची अधिकृत तपासातून पडताळणी होणे बाकी आहे. मानपाडा, मनोरमा नगर आणि आझाद नगर परिसरात प्रदीप पूर्णेकर यांचा राजकीय प्रभाव असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरणातही या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत.






