बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे २१ दिवसांपेक्षा अधिक खंड असलेल्या मंडळांमध्ये पूर्ण खरीप हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या पावसावर उगवलेली पिके आता पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाया जाण्याची भीती आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ स्तरावर दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे लागल्या आहेत.
पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाई आणि दुष्काळी मदतीबाबत शासन काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दीर्घ खंडाची सर्वाधिक तीव्रता काही मंडळांत दिसून येत आहे. देवळा तालुक्यातील उमराणे येथे ४५ दिवस, कळवण तालुक्यातील मोकभणगी येथे ४०, मालेगाव तालुक्यातील कौळाणे, सौंदाणे, निमगाव येथे ४५ दिवस, दाभाडी येथे ४४ दिवस, तर नांदगाव तालुक्यातील जातेगाव, हिसवळ बु. आणि भर्डी येथे प्रत्येकी ४५ दिवसांचा पावसाचा खंड आहे.
येवला तालुक्यातील येवला व सावरगांव येथे ४२, पाटोदा व जळगाव येथे ४१ दिवस, तर सिन्नर तालुक्यातील सिन्नर मंडळात ४०, शहा मंडळात ४२ दिवसांचा खंड नोंदवला आहे. सिन्नर तालुक्यात सिन्नर, शहा, नांदूरशिंगोटे, सोनांबे, डुबेरे, वावी, वडांगळी आणि गोंदे या आठ मंडळांत २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे. यामध्ये शहा ४२, सिन्नर ४०, सोनांबे ३७, वडांगळी २७, नांदूरशिंगोटे, डुबेरे व वावी प्रत्येकी २५ आणि गोंदे २३ दिवस असा खंड आहे. त्यामुळे तालुक्यातील खरीप पिकांवरही पावसाच्या दडीचा परिणाम जाणवत आहे.
सिन्नर तालुक्यातील १२ पैकी ८ कृषी मंडळांमध्ये २१ ते ४० दिवसांपर्यंत पावसाचा दीर्घ खंड पडला आहे. त्यामुळे येथील पिके जवळपास हातातून गेली आहेत. ज्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाणी आहे. तिथेही अपुऱ्या पावसामुळे ४० ते ५० टक्के पर्यंत उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे, सिन्नर तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी माहिती दिली.
तालुकानिहाय पाहता मालेगाव, सिन्नर आणि येवला येथे प्रत्येकी ८ कृषी मंडळे २१ दिवसांपेक्षा अधिक खंडाच्या कक्षेत आहेत. नांदगावमध्ये ७, बागलाण व कळवणमध्ये प्रत्येकी ६, तर चांदवड, देवळा व नाशिकमध्ये प्रत्येकी ३ मंडळांचा समावेश आहे. दिंडोरी व निफाडमध्ये प्रत्येकी एका मंडळात दीर्घ खंड नोंदला आहे, मालेगाव, सिन्नर, येवला आघाडीवर यांनी माहिती दिली.
Nashik Crime: गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले; अन् पुन्हा कधीच परतले नाही!, ३३ वर्षीय इंजिनिअर…






