सौजन्य - नवराष्ट्र टीम
आळेफाटा : सुरुवातीच्या पावसावर चांगली उगवण झाल्याने यंदा सोयाबीनचे पीक हातात येईल, अशी आशा बाळगलेल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या चिंतेत आता मोठी भर पडली आहे. शेंगा भरण्याचा आणि दाणे तयार होण्याचा निर्णायक टप्पा सुरू असतानाच पावसाने दडी मारल्याने अनेक शेतांमधील सोयाबीनची वाढ खुंटली असून, पाने पिवळी पडून वाळू लागली आहेत. काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्याने पिकाला आवश्यक ओलावा मिळेनासा झाला आहे.
आळे, वडगाव आनंद, संतवाडी, कोळवाडी, राजुरी, पिंपळवंडी, बोरी बुद्रुक, आणे, शिंदेवाडी आदी परिसरात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकाची उगवण समाधानकारक झाली. मात्र त्यानंतर पावसाने खंड दिल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. सध्या सोयाबीनच्या शेंगा भरण्याचा महत्त्वाचा काळ आहे. याच काळात पिकाला पुरेसा पाऊस मिळणे अपेक्षित असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. कोरडवाहू क्षेत्रातील परिस्थिती अधिक गंभीर असून काही शेतांमध्ये पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.
विहिरी-कूपनलिकेच्या पाण्यावर किती भाग वाचवायचा?
पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी उपलब्ध पाण्याचा आधार घेत आहेत. मात्र विहिरी आणि कूपनलिकांमध्येही मर्यादित पाणीसाठा असल्याने संपूर्ण क्षेत्राला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय अनेक शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही. सोयाबीनच्या उत्पादनावरच अनेक शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील आर्थिक गणित अवलंबून आहे. पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असून लागवड, खते, औषधे आणि मशागतीवर झालेला खर्च भरून काढणेही कठीण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
सोयाबीनला सध्या पाण्याची मोठी गरज आहे. मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने कोरडवाहू क्षेत्रातील परिस्थिती गंभीर झाली आहे. उपलब्ध पाणी मर्यादित असल्याने सर्वच क्षेत्राला पाणी देणे शक्य होत नाही. – सुरेश चौगुले, शेतकरी.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषानुसार मदत मिळावी
पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्यास प्रशासनाने संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. एकीकडे आभाळाकडे नजर, तर दुसरीकडे सुकणाऱ्या सोयाबीनकडे पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता पावसाची एक सर केवळ पीकच नाही, तर शेतकऱ्यांचे बिघडलेले आर्थिक गणितही वाचवू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.






