सौजन्य - नवराष्ट्र टीम
माळेगाव : शेती करताना शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती, रोगराई, पाण्याचे नियोजन आणि बाजारभावातील चढ-उतार अशा विविध आव्हानांवर मात करून काही शेतकरी नियोजनबद्ध शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत आहेत. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील अनिल जाधव आणि अशोक जाधव या बंधूंनी तीन ते चार एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग फुलवून शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे.
जाधव कुटुंबीयांनी डाळिंबाच्या बागेचे काटेकोर नियोजन केले आहे. दोन एकर क्षेत्रात सुमारे १४०० डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या बागेतून यंदा सुमारे ३० + टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले. डाळिंबाला सरासरी प्रतिकिलो ११५ रुपये दर मिळाल्याने या उत्पादनातून लाखोंची लाख रुपयांची उलाढाल झाली. उत्पादन खर्च वजा केल्यानंतर मिळणारा निव्वळ नफा वेगळा असून, बागेने कुटुंबाच्या उत्पन्नात चांगली भर घातली आहे.
डाळिंबाच्या बागेसाठी जाधव बंधूंनी खत-पाणी व्यवस्थापनाला विशेष महत्त्व दिले. रासायनिक खतांसोबतच जैविक खते आणि शेणखताचा वापर करण्यात आला. बागेची वेळेवर छाटणी, पाण्याचे सूक्ष्म नियोजन आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून झाडांना पाणी देण्यात आले. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करून बागेची वाढ आणि उत्पादन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बागेची विशेष काळजी घेतली
डाळिंब बागांसाठी तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हे मोठे आव्हान मानले जाते. या पार्श्वभूमीवर जाधव कुटुंबीयांनी बागेची विशेष काळजी घेतली. दोन एकर क्षेत्रातील बागेवर कापडाचे आच्छादन केल्यामुळे कडक उन्हापासून फळबागेचे संरक्षण होण्यास मदत झाली. तसेच वातावरणातील प्रतिकूल परिणाम आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठीही या उपायाचा उपयोग झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
मेहनतीची परंपरा पुढील पिढीनेही कायम ठेवली
अनिल आणि अशोक जाधव यांनी आयुष्यभर जपलेली शेतीची आवड आणि मेहनतीची परंपरा पुढील पिढीनेही कायम ठेवली आहे. शुभम अशोक जाधव, वैभव अनिल जाधव आणि सूरज अनिल जाधव हे तरुण आपापले व्यवसाय सांभाळत डाळिंब शेतीतही लक्ष देत आहेत. एकत्र कुटुंबपद्धती जपत आधुनिक शेतीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन परिसरातील शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. “आजच्या काळात एकत्र कुटुंबपद्धत टिकवून ठेवत व्यवसाय सांभाळून तरुणांनी शेतीकडे लक्ष दिले, तर शेती केवळ पारंपरिक व्यवसाय न राहता नियोजनबद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उद्योग बनू शकतो,” असा संदेश जाधव परिवाराच्या शेती प्रयोगातून मिळत आहे.






