
सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प (फोटो सौजन्य-ChatGPT)
Nashik Kumbh Mela: गोदावरीच्या काठावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या बहुचर्चित सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्त्यांचा केवळ विस्तार होत नाही, तर भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा नकाशाच बदलण्याच्या दिशेने पावले पडत आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात तब्बल १ हजार ४३५.८१ किलोमीटर रस्ते पायाभूत कामे सुरू असून, कुंभमेळ्यातील गर्दीचे नियोजन करण्याबरोबरच ही यंत्रणा पुढील अनेक वर्षे शहराच्या दैनंदिन वाहतुकीला उपयोगी ठरणार आहे.
यात रस्ते विकासात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएच-पीडब्ल्यूडी, नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका तसेच नाशिक रिंग रोडचा समावेश आहे. एनएचएआयकडून ३१६.१ किमी, पीडब्ल्यूडीकडून दोन्ही टप्प्यांत मिळून ७३२.८ किमी, एनएच-पीडब्ल्यूडीकडून १७५.५ किमी, नाशिक महापालिकेकडून १२८ किमी, तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेकडून १७.६ किमी रस्ते कामांचा समावेश आहे. याशिवाय ६५.६ किमी लांबीचा नाशिक रिंग रोड हा या संपूर्ण वाहतूक आराखड्यातील महत्त्वाचा घटक आहे, असे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
पंचवटीतील पेठ रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग
या कामांचे वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यांच्या विकासासोबतच विविध मूलभूत सुविधांचे नियोजन केले जात आहे. रस्त्याच्या कॉरिडॉरमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वीज, ऑप्टिकल फायबर केबल आणि एमएनजीएल गॅस पाइपलाइन यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे कुंभासाठी होणारी रस्त्यांची कामे कैथळ वाहतुकीपुरती मर्यादित न राहता शहराच्या भविष्यातील पायाभूत सुविधांचा भाग ठरणार आहेत, त्यामुळे भविष्यात नाशिककरांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असा विश्वासही त्यानी यावेळी बोलताना व्यक्त केला.
नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्वाचा बदल म्हणजे ६५.६० किमीचा नाशिक रिंग रोड, शहराच्या मध्यवर्ती भागावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. शहरातील अंतर्गत व बाहा मार्ग, तीर्थक्षेत्रांकडे जाणारे रस्ते, घाट परिसर, नाशिक रोड रेल्वे स्थानक तसेच विमानतळाशी जोडणी अधिक सक्षम करण्याचे नियोजन आहे. या रस्ते जाळ्याचा उपयोग भविष्यात पर्यटन, मालवाहतूक, औद्योगिक वाहतूक आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठीही होणार आहे.
संबंधित रस्ते पायाभूत सुविधाची कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यांची आखणी कुंभमेळ्याच्या काळातील वाहतूक व्यवस्थापनापुरती मर्यादित नसून, कुंभानंतरही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या वाहतुकीची क्षमता वाढविणारी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा म्हणून करण्यात येत आहे. कमी होणारी वाहतूक कोंडी, दैनंदिन प्रवासातील सुधारणा, पर्यटन व उद्योगांना मिळणारी जोडणी, सुरक्षित रस्ते आणि बहुविध वाहतूक व्यवस्थेला मिळणारे बळ हे त्याचे अपेक्षित दीर्घकालीन परिणाम आहेत.
सिंहस्थासाठीची ही तयारी केवळ २०२७च्या कुंभमेळ्यापुरती मर्यादित ठेवण्याचा आमचा उद्देश नाही. कुंभाच्या निमित्ताने उभारली जाणारी वाहतूक व्यवस्था नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पुढील अनेक वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केली जात आहे. नागरिक, भाविक, पर्यटक तसेच उद्योग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला दीर्घकालीन लाभ मिळेल, अशा पद्धतीने या पायाभूत सुविधांकडे पाहिले जात आहे. “असे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. सिंहस्थाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि वाहनांची आवक होणार असल्याने शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे हे मोठे आव्हान असेल, त्यासाठी रस्त्यांचे जाळे केवळ प्रमुख मार्गापुरते न ठेवता शहरातील अंतर्गत वाहतूक, शेवटच्या टप्प्यातील जोडणी आणि तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या मार्गाचा समावेश करून विकसित केले जात आहे.
“विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!