माहेरी आलेल्या नवविवाहितेने प्रियकरासोबत ठोकली धूम; सासरकडील सोनं, महागडे कपडे नेले पळवून (Photo : iStock)
सटाणा : लग्न म्हणजे साता जन्माच्या गाठी, आयुष्यभराची साथ अशा पूर्वापार चालत आलेल्या धारणेला सटाणा येथील एका विवाहाने चांगलाच धडा दिला आहे. चित्रपटाला शोभावी अशा कथेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या विवाह नात्यातील नव्या नवरीने अशी काही करामत केली की, तिची वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात पोहचली आहे.
काही दिवसांपूर्वी नंदू झिप्रू पानपाटील (रा. रावळगाव) व रंजना झिप्रू पानपाटील यांची कन्या मिना हिचा विवाह सटाणा येथिल एका प्रतिष्ठित घराण्यात झाला होता. मीना हिने आनंदात विवाह केला. विवाह झाल्यावर सर्वांशी मिळून मिसळून वागलीही. मात्र, माहेरी जाताना घरातील सोने, महागडे कपडे गुंडाळून सोबत घेऊन गेली. नवरी माहेरी गेली म्हणून सासरचेही निवांत होते. मात्र, दुसऱ्या दिवशी जेव्हा सासरची मंडळी नव्या नवरीला आपल्याकडे आणण्यासाठी जाऊ लागले, तेव्हा नवरीच्या घरचे सासरच्या लोकांना उडवा-उडवीचे उत्तरं देऊ लागले.
यावरुन सासरच्या लोकांना शंका येऊ लागली. त्यानंतर सासरच्या लोकांनी खोलात जाऊन विचारपूस केली तर लक्षात आले की, नवी नवरी लग्नाच्या नवऱ्याला सोडून अन्य विवाहित व्यक्तीबरोबर पळून गेली. त्यानंतर सासरच्या लोकांनी घरातील सोने, महागडे कपडे यांची तपासणी केली तर तो सर्व ऐवज नवी नवरी तिच्यासोबत पळवून घेऊन तिने पोबारा केल्याचे निष्पन्न झाले.
विवाहित पुरुषासोबत गेली अहमदाबादला
याविषयी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात तिच्या पळून जाण्याविषयी खबर देखील दाखल तिच्या घरच्यांनी केली. पोलीस व घरच्यांनी तपास केला असता ती अहमदाबाद येथे घराजवळील एका विवाहित पुरुषासोबत पळून गेल्याचे समोर आले.
नव्या नवरीची वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात
नव्या नवरीने केलेली ही करामत सर्वांसाठीच धक्कादायक होती. त्यामुळे तिच्या सासरच्या लोकांनी सटाणा पोलीस ठाणे येथे धाव घेत मिना हिच्यासह तिचे आई-वडील, तिचा प्रियकर तसेच अन्य व्यक्तींविरोधात फसवणूक व चोरीसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. मिनाच्या या करामतीमुळे नव्या नवरीची वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली.