
नाशिक : माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महाराष्ट्रातील लाखो महिलांनी अर्ज भरले आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठविणार असल्याची माहिती समोर आली होती. पण, आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट १९ ऑगस्टच्या आधीच मिळणार असल्याची माहिती आहे. अशातच आता नाशिक येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींनी आमचा लाडका भाऊ उद्धव ठाकरेच आहेत, अशी घोषणाबाजी केल्याने शहरात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको भागात विविध कार्यक्रम पार पडले. परंतु माजी नगरसेविका किरण दराडे, बाळा दराडे यांच्या कार्यक्रमांची दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा होती. एकीकडे लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात श्रेयवादाची स्पर्धा सुरु असतानाच किरण दराडे व बाळा दराडे यांनी प्रभागातील सातशे ते आठशे महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मेळावा घेऊन सुविधा उपलब्ध करून दिली.
उद्धव ठाकरेच आमचा लाडका भाऊ
15 ऑगस्ट ला काही महिलांच्या खात्यावर पैसे देखील आल्याने महिलांनी ठाकरे गटाचे आभार मानले. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, पुंजाराम गामणे, बाळा दराडे यांना राखी बांधली. आमचा लाडका भाऊ उद्धव ठाकरेच, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. येत्या काळात मशालीलाच मतदान करणार असल्याचेही यावेळी महिलांनी म्हटल्याने नाशिकला झालेल्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत आहे.
लाडकी बहिण योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे, 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.