
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा
NCMC Card ST Bus : एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध सवलती मिळवताना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. NCMC कार्ड सक्तीचा गोंधळ तात्काळ थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जयंत पाटील यांनी आपल्या अधिकृत X अकाऊंटवर पोस्ट करत सरकारच्या निर्णयावर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऐन गणेशोत्सवाच्या काळात अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC कार्डशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन, काही ठिकाणी कार्डांचा तुटवडा, तर काही ठिकाणी रिचार्ज करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचा दावा त्यांनी केला.
कार्डशी संबंधित अडचणींमुळे पात्र प्रवाशांनाही काही ठिकाणी पूर्ण तिकीटाचे पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. महिला प्रवासी प्रत्यक्ष एसटी बसमध्ये उपस्थित असताना केवळ कार्ड नसल्यामुळे सवलतीपासून वंचित ठेवणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘महिलांना सवलत देताना कार्डाची सक्ती कशासाठी?’ असा सवाल करत पाटील यांनी ही सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी परिवहन मंत्री आणि मुख्य सचिवांना पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली होती. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणांमुळे पात्र महिला अथवा ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले होते.
कचरा कोंडीवरून पिंपरी महापालिकेत रणकंदन; मोशी डेपोला टाळे ठोकण्याचा नगरसेवकांचा इशारा
ज्यांनी स्मार्ट कार्डसाठी अर्ज केला आहे, मात्र अद्याप त्यांना कार्ड मिळालेले नाही, अशा प्रवाशांनाही वाढीव मुदतीदरम्यान पूर्वीप्रमाणे शासनाच्या सवलतींचा लाभ घेता येईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले होते.
आता मुदतवाढीनंतरही NCMC कार्डबाबत प्रवाशांच्या अडचणी कायम असल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एसटी सवलत आणि NCMC कार्ड सक्तीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.