फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई : राज्याचे राजकारण सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीभोवती फिरत आहे. आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडत आहे. मात्र 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही लढाई चुरशीची होणार असून क्रॉस मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष सावध भूमिका घेताना दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांचा जामीन कालावधी संपत आला आहे. याबाबत सुप्रिम कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. त्यामुळे नवाब मलिक पुन्हा तुरुंगात जाणार का याची चर्चा सुरु आहे.
ईडीकडून 2022 मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट 2023 मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. आजारपणाच्या व प्रकृतीच्या कारणावरुन जामीन देण्यात आला होता. त्यानंतर आज मलिक यांच्या जामीनाचा शेवटचा दिवस आहे. त्यांच्या जामीनाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय होणार आहे. न्यायालयाकडून मुदतवाढ किंवा न मिळाल्यास त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार असून कोर्ट नंबर 14 मध्ये आज 61 व्या नंबरवर नवाब मलिक यांच्याबाबत सुनावणी आहे. त्यामुळे आज नवाब मलिक आज विधान परिषदेसाठी मतदान करणार की नाही याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोणता झेंडा घेणार हाती?
नवाब मलिक यांना गोवावाला कंपाऊंड प्रकरणात ईडीकडून अटक झाली आहे. ते तुरुंगामध्ये असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडून अजित पवार गट व शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. तुरुंगामधून जामीनावर बाहेर आल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटामध्ये सामील होणार याची चर्चा रंगली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी अजित पवार गटाची साथ देत भाजप व शिंदे गट यांच्या युतीला पाठिंबा दिला. त्यानंतर आता नवाब मलिक यांचा जामीन वाढवणार की त्यांना पुन्हा तुरुंगाची हवा खायला जावे लागणार याबाबत निर्णय येणार आहे.