पुणे : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 4 जूननंतर राजकारणामध्ये उलथापालथ झाली आहे. भाजपला देशासह राज्यामध्ये अपेक्षित असे निकाल आलेले नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी निकालाची जबाबदारी घेत राजीनाम्याची मागणी केली. यानंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडाली. लोकसभा निवडणूक 224 मध्ये राज्यामध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडी जास्त सरस ठरली. राज्यातील एकूण 48 जागांपैकी फक्त 17 जागा महायुतीला मिळाल्या असून 30 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. राज्यामध्ये भाजपपेक्षा जास्त जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या असून अजित पवार गटाला तर केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निकालानंतर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा दावा केला आहे.
यंदाची लोकसभा निवडणुक अजित पवार गटासाठी अत्यंत महत्त्वाची असून भविष्य ठरवणारी होती. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या. मात्र सुप्रिया सुळे यांनी लाखोंच्या मतांनी बारामतीचा गड राखला. त्याचबरोबर आढळराव पाटील हे देखील शिरुरमध्ये पराभूत झाले. मतमोजणी सुरु झाल्यापासून आढळराव पाटील यांनी एकदा अमोल कोल्हे यांच्यापुढे आघाडी घेतली नाही. या निकालांमुळे अजित पवार यांना एनडीएच्या दिल्लीतील बैठकीला देखील उपस्थिती लावली नाही. अजित पवार यांनी निकालानंतर अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील अनेक आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे.
१९ आमदार शरद पवाराच्या संपर्कात
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मत व्यक्त केले. रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांचे १९ आमदार शरद पवाराच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तर त्यांच्या गटातील इतर १२ आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ते काय करतील ते पुढच्या काही दिवसांत आपल्याला समजेल. परंतु, या १९ आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना, तसेच ज्यांना भाजपाने मारून-मुटकून, अडचणीत आणून तिकडे नेलं असेल त्यांना दुसरं प्राधान्य द्यावं. असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतं,” असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.