बीड : लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमध्ये प्रतिष्ठेची लढत झाली. भाजपकडून पंकजा मुंडे तर शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. अगदी शेवटच्या फेरीमध्ये अटी तटीच्या निकालानंतर बजरंग सोनावणे यांना विजयी घोषित करण्यात आले. यानंतर शरद पवार गटाने जल्लोष करण्यात आला. बीडचा भाजपच्या किल्ल्याला सुरंग लावण्यात बजरंग सोनावणे यांना यश आले. यानंतर आता ते अजित पवार गटाची कास धरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी बजरंग सोनावणे अजित पवार गटामध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचक विधान केले आहे.
सुनील तटकरे म्हणाले, “आमच्या पक्षाचा वर्धापन दिन झाला. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सर्वांना सूचना केल्या. मात्र, छगन भुजबळ यांना सूचना केल्या नाही. कारण पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पक्षाच्या प्रवक्त्यांनी किंवा अन्य मंत्री महोदयांनी विधानसभेच्या जागा वाटपाच्या दृष्टीने कोणीही चर्चा करू नये, असं म्हटलं आहे. मात्र, छगन भुजबळांना तो अधिकार असून त्यांच्याबाबत मी काहीही बोलणार नाही”, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
सुनील तटकरे सोनवणेंबाबत काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. यावर सुनील तटकरे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “अमोल मिटकरी जे काही बोलले आहेत. कारण त्यांच्याकडे काही माहिती असेल. पण मी पक्षाच्या कामामध्ये व्यस्त होतो. त्यामुळे याबाबत मी माहिती घेऊन. मात्र, एक नक्की आहे की अनेकजण अजित पवार आणि आमच्या संपर्कात आहेत”, असं सूचक विधान सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.