बीड : लोकसभा निवडणुकीमध्ये बीड मतदारसंघातून विजयी झालेले शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग अजित पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अजित पवार गटाचे प्रवेक्ते अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. त्याचबरोबर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील याबाबत सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे निकालानंतर लगेचच शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार अजित पवार गटात जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर आता बजरंग सोनावणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले बजरंग सोनावणे?
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना खासदार बजरंग सोनावणे म्हणाले, “अमोल मिटकरी कोण आहेत? अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? अमोल मिटकरी कोण आहेत हेच मला माहिती नाही. अजित पवारांच्या बंगल्यावर ऑपरेटर म्हणून एखादे अमोल मिटकरी असतील. त्यामुळे अजित पवारांना दिवसभरात किती आणि कोणाचे फोन येतात, याचे रेकॉर्ड त्यांच्याकडे असेल. मात्र, अमोल मिटकरी कोण आहेत हे पहिल्यांदा महाराष्ट्राला कळलं पाहिजे. तसेच त्यांचा बोलवता धनी कोण? हेही मिटकरींनी सांगितलं पाहिजे”, अशी खोचक टीका बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरींवर केली.
अमोल मिटकरी यांचे ट्वीट
बीडच्या बप्पाचा दादांना फोन #मोठ्यामनाचादादा
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 11, 2024
पुढे सोनावणे म्हणाले,“अमोल मिटकरींनी ट्विटमध्ये काय म्हटलं? शरद पवारांचा एक खासदार अजित पवारांच्या संपर्कात आणि लवकरच काय ते कळेल. आता मला एक सांगा. बीड जिल्ह्यातील जनतेनं माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे. त्यामधून कितीही उतराई करण्याचा प्रयत्न केला तरी मी कमी पडेल. माझ्या मनात काही असतं आणि मी माझ्या बंगल्याच्या बाहेर वेगळा विचार करून गेलो तर बीड जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलेने फोडेल. ते जाऊद्या मी शरद पवारांना सोडायचं म्हटलं तरी माझे वडील माझ्या कानशिलात लगावलीत आणि माझी बायको म्हणेल की तुम्हाला खायलाही मिळणार नाही, नाश्तादेखील नाही, अशी परिस्थिती होईल”, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली.