फोटो सौजन्य - Social Media
भायखळा परिसरातील ऐतिहासिक India United Mill जागेवर अत्याधुनिक टेक्सटाईल, क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम उभारण्याच्या प्रकल्पाला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकारत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी संबंधित संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.
मुंबईच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाचे जतन, पुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक पुनरुत्थान हे या भव्य प्रकल्पामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. एकेकाळी कापड गिरण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील गिरणी परिसराचा ऐतिहासिक ठेवा नव्या रूपात जतन करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. Mumbai Metropolitan Region Development Authority, National Textile Corporation (एनटीसी) आणि JSW Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले हे गिरणी प्रांगण भविष्यात जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक केंद्रात रूपांतरित होणार आहे.
या म्युझियममध्ये आकर्षक गॅलरीज, कला स्टुडिओ, परफॉर्मन्स स्पेसेस, खुल्या जागेतील शिल्प उद्यान, रेस्टॉरंट्स व कॅफे, तसेच कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र विभाग असणार आहेत. संग्रहालयाला ‘लिव्हिंग म्युझियम’ संकल्पनेनुसार विकसित करण्यात येणार असून, जुन्या गिरणीचा औद्योगिक वारसा जतन करत आधुनिक तंत्रज्ञान आणि सादरीकरणाची सांगड घालण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांसोबतच संशोधक, विद्यार्थी आणि कलाकारांसाठीही हे केंद्र प्रेरणास्थान ठरणार आहे.
प्रकल्पाचे संपूर्ण काम जेएसडब्ल्यू फाउंडेशनकडून विनालाभ तत्वावर करण्यात येणार असून, संग्रहालयातून मिळणारे उत्पन्न देखभाल, जतन आणि विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे. या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्राला दीर्घकालीन बळकटी देण्याचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या ‘शहरी वारसा संवर्धन व सांस्कृतिक पुनरुत्थान’ या दृष्टीकोनाला हा प्रकल्प पूरक ठरणार आहे. मुंबईतील विस्मृतीत गेलेल्या गिरण्यांचा इतिहास नव्या पिढीसमोर उभा करण्यासोबतच शहरी पुनरुत्थानाचे आदर्श उदाहरण म्हणून हा प्रकल्प ओळखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रकल्पाचे कालबद्ध नियोजन करून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिल्याची माहिती जेएसडब्ल्यू फाउंडेशनने दिली आहे.






