संत ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वागतासाठी नीरा नगरी सज्ज
नीरा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त नीरा नगरीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, महावितरण, जलसंपदा व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नीरा गाव पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. नीरा नदीच्या काठावर असलेल्या पालखी विसावा स्थळावर निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे.
गावात स्वच्छता, वाहतूक, आरोग्य व वीज व्यवस्थांवर विशेष भर देण्यात आला आहे. नीरा ग्रामपंचायतीने गटारांची सफाई, पाण्याच्या टाक्यांचे निर्जंतुकीकरण तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सावली व बॅरिकेड्सची व्यवस्था केली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रास सूचना देण्यात आल्या असून, गावातील हॉटेल्स व अन्नपदार्थांची तपासणी सुरू आहे. पालखी काळात पालखीतळाजवळ ‘हिरकणी कक्ष’ व ओपीडीही सज्ज करण्यात आली आहे.
महावितरण विभागाने देखील चोख तयारी केली असून, गावातील विजेच्या डीपीतील फ्यूज बदलण्यात आले आहेत. विजेच्या झोळलेल्या तारांचे नियोजन करून वाकलेले खांब सरळ करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान अखंडित वीज पुरवठा राहील, यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेचा भाग म्हणून पोलीस यंत्रणेला विशेष पथक नेमावे लागले असून, वाहतूक बदलांमुळे त्यांची दमछाक सुरू आहे. नीरा नदीच्या जुन्या पुलाकडे जाणाऱ्या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले असून, रस्त्याच्या दुतर्फा कचरा कुंड्या, मोबाईल टॉयलेट व पाणी भरण्याची ठिकाणे उभारण्यात आली आहेत.
वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान मानले जाते पवित्र
आषाढी शुध्द एकादशी सोहळा 6 जुलै रोजी होत आहे. या सोहळ्यात वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान फार पवित्र मानले जाते. यात्रा कालावधीत चंद्रभागा स्नानासाठी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. सद्य:स्थितीत भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात आल्यानंतर वाळवंट किती प्रमाणात शिल्लक राहिल या पूरजन्य परिस्थितीचा आराखडा तयार करून त्वरित सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत.