नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांचा 1 लाख 42 हजार 797 मतांनी पराभव केला. ठाकरे यांनी गडकरी यांनी कडवी झुंज दिल्याची चर्चा यानिमित्त व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी पराभवानंतरही मागील 2019 च्या तुलनेत काँग्रेसची मते वाढल्याचे आकडेवारीतून दिसून आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांच्या रुपात आव्हान उभे केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. त्यातच गडकरींना दगाफटका होतो की काय, अशीही चर्चा रंगली होती. मात्र, शेवटी गडकरी यांनी नागपूरचा गड कायम राखला. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा पराभव करत विजयाची हॅट्रीक नोंदविली. काँग्रेसचा पराभव झाला असला तरी 2019 च्या तुलनेत काँग्रेसने 73 हजार 212 मते अधिक घेतली.
मागील निवडणुकीत काँग्रेसला 4 लाख 44 हजार 212 मते पडली होती. अर्थात ही मते नवमतदारांची असण्याची शक्यता असून, तरुणाने विकास ठाकरे यांना कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये 5 हजार 194 मतांची घसरण झाली आहे. मागील निवडणुकीत गडकरींनी 2 लाख 16 हजार 9 मतांची विजयी आघाडी घेतली होती. विजयी मतांमध्येही घट झाली आहे.