श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन मिळणार ऑनलाईन; इथं भाविकांना करता येणार ऑनलाईन नोंदणी (File Photo : Vitthal Rukmini Mata)
पंढरपूर : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस दानशूर भाविकांकडून सोन्याचा चार पदरी हार पदकासह, ठुशी व चेन असे 6 लाख 50 हजार किंमतीचे दागिने व 2 लाख रूपयाची देणगी मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
राकेश परशुराम दलाल व रुपेश परशुराम दलाल (रा.ठाणे) यांनी कै. परशुराम गोविंद दलाल या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सोन्याचा चार पदरी हार पदकासह व ठुशी असे सुमारे 73.950 ग्रॅम वजनाचे दागिने अर्पण केलेले आहेत. त्याची अंदाजे 5 लाख 82 हजार इतकी किंमत होत आहे. त्याबद्दल देणगीदार भाविकाचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कर्मचारी रमेश गोडसे यांच्या हस्ते श्रींचा फोटो, उपरणे, दिनदर्शिका व दैनंदिनी देऊन सन्मान करण्यात आला.
याशिवाय, संकेत भास्कर पंडित (रा. छत्रपती संभाजीनगर) या भाविकाने 9.800 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन अर्पण केली असून, त्याची 77 हजार इतकी किंमत होत आहे. त्याबद्दल त्यांचा देखील मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच पी.एस. कुमारगुरूतम, चेन्नई यांनी धनादेश स्वरूपास 2 लाख रूपयांची देणगी दिली. त्यांचा देखील मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते उपरणे व श्रींचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला.
दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्याची आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी घेण्याबाबत तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली आहे.