वसई । रविंद्र माने : आरटीआय कार्यकर्त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या घरावर भल्या पहाटे गोळीबार करणाऱ्या आणि सुपारी देणाऱ्या त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे.
विरार पूर्वेच्या गोपचर पाडा येथील आशियाना इमारतीत राहणारे मोबीन शेख हे आरटीआय कार्यकर्ते आहेत. मोबीन शेख आणि त्यांच्या पत्नी मुलांसह आशियाना इमारतीत राहतात. १५ जानेवारीला पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याच्या घराचा दरवाजा कोणीतरी ठोठावला होता. अम्मी की तबीयत ठिक नही है, दरवाजा खोलो अशी बाहेरुन हाक आली, त्यामुळे शेख यांच्या पत्नीने कोण है अशी विचारणा केल्यावर त्यांना प्रत्युत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे अज्ञात हल्लेखोरांनी खिडकीतून घरात गोळी झाडली. झाडलेली गोळी भिंतीला लागली त्यामुळे जीवितहानी झाली नाही. याप्रकरणाची माहिती मिळाल्यावर विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर गोळी झाडणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी विरार पोलीसांनी पथके तयार केली होती. मोबीन शेख हे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतात. त्यांच्यावर यापूर्वी एसिड हल्ला झाला होता. त्या दृष्टीने पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास केला.
घटनास्थळी मिळालेले प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीच्या आधारे, गुन्हा करण्यासाठी अॅक्टीव्हाचा वापर केल्याचे दिसून आले. सदर मोटर सायकलचा मागोवा घेत असतांना, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मोहित ठाकुर, ( रा.नालासोपारा पूर्व) याला अंधेरी येथून अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केल्यावर मस्तान शेख नावाच्या इसमाने मोमीन शेख यांना ठार मारण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे कबुली दिली. त्यात अजय ठाकूर सहभागी असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तांत्रिक आणि गुप्त माहितीद्वारे मस्तान शेख आणि अजय ठाकुर सुरत येथे सापळा रचून, पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस, २ सुरे, मोटर सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय पवार, पोलीस निरिक्षक गुन्हे अभिजित मडके, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश फडतरे, हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, हर्षद चव्हाण, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, दत्तात्रय पगार,संदिप शेळके, मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पूरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, नामदेव ढोणे, संतोष खेमनर यांनी ही कामगिरी केली.