File Photo : Onion Market
नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात किमान निर्यातमूल्यही 20 टक्क्यांनी कमी केले. आता निर्यातीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढणे अपेक्षित होते; मात्र, कांद्याचे दर ‘जैसे थे’च आहेत. कांदा आजही 60 ते 70 रुपये किलो या दराने खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे निर्यातबंदी हटविल्याचा कोणताही सकारात्मक परिणाम दिसून आला नाही.
हेदेखील वाचा : राज्यात आता पुन्हा पाऊस बरसणार; हवामान विभागाने व्यक्त केला ‘हा’ अंदाज
सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच कांद्याला साडेतीन हजार रुपयांवर भाव मिळण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात 10 ते 15 टक्के कांदा शिल्लक असल्याने कितीही भाववाढ झाली तरी आवक आहे तेवढीच राहील. केंद्र सरकारने याचा अचूकपणे अंदाज घेऊन कांदा निर्यातीवरील 500 डॉलरचे शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला. यामुळे निर्यात खुली होण्यास मदत झाली व त्याचा कांद्याच्या भावावर थेट परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, कांद्याचे उत्पादनच घटल्याने आता शेतकऱ्यांकडे थोडाच कांदा शिल्लक राहिला आहे.
दरम्यान, काद्यांचे दर कितीही वाढले तरी उन्हाळ कांद्याची आवक वाढणार नाही. त्याला पर्याय म्हणून लाल कांद्याची आवक वाढत चालली आहे. या कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यामुळे काढणीनंतर हा कांदा तत्काळ बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये भाव मिळत आहे.
6 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक
लासलगाव बाजार समितीत दररोज पाच ते सहा हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होते. त्यापाठोपाठ निफाड, विंचूर, सिन्नर, कळवण, चांदवड, मनमाड, बागलाण, पिंपळगाव बसवंत बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक आहे.
हेदेखील वाचा : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान आज ; 39 लाख नागरिक बजावणार मतदानाचा हक्क