पालघर : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. सणसमारंभात कोणत्याही प्रकारे घातपात होऊ नये यासाठी संवेदशील ठिकाणावर असलेल्या विसर्जन स्थळांवर पुरेपुर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. श्रींच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मनोर परिसरातील शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी मंगळवारीमनोर शहरातील विविध गणेश मंडळांचे मंडप तसेच विसर्जन स्थळांची धावती पाहणी दौरा केला आहे.
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पंडाल व विसर्जन स्थळ परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेत स्थानिक पोलिसांना सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले.त्यांनी भाविकांना शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात सण साजरा करण्याचे आवाहन केले.विशेष म्हणजे मागील दिवसात सरावली येथे गणपती विसर्जना वेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाल्याने अधिक काळजी घेतली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक देशमुख यांनी वैतरणा नदीकाठा वरील प्रमुख विसर्जन स्थळाला भेट देऊन आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक सरपंच चेतन पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सुरक्षा व्यवस्थेबाबत सूचना दिल्या. “सण आनंदाने साजरे व्हावेत पण कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे,” असे देशमुख यांनी सांगितले.
समुद्रकिनारा असल्यामुळे अनेकदा धमकीचा इशारा किंवा संशयित बोट सापडल्याच्या घटना वारंवार घडल्य़ा आहेत. त्यामुळे सण उत्सावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हात शांतता कायम रहावी तसंच कोणत्याही प्रकारे घातपात होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पालघर पोलीस अधीक्षकांनी गणेश मंडळांचे मंडप तसेच विसर्जन स्थळांचा धावता पाहणी दौरा केला आहे.