खराब रस्त्यामुळे पालघर - छ. संभाजीनगर बसचा अपघात
दीपक गायकवाड/मोखाडा: पालघर-वाया वाडा-खोडाळा मार्गे नाशिककडे जाणारी छ. संभाजीनगर बस (क्रमांक MH 06 – 9570) ही श्रीघाट–देवगांवदरम्यान देवगांव फाट्याजवळील वळणावर अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत ३ प्रवासी गंभीर तर २० हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जखमींना तत्काळ खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही प्रवाशांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याचे निवडले आहे. शाहनुरुबी खान (60) यांना हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी पुढे संदर्भित करण्यात आले.
अर्पणद्वारे मुंबईत ‘बाल सुरक्षा सप्ताह’ची सुरुवात, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार
पालघर आगाराची ही बस सकाळी ७ वाजता सुटून नाशिककडे जात होती. श्रीघाट–देवगांवदरम्यान तीव्र वळणावर रस्ता खराब असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्टीवरून घसरत काही अंतरावर कोसळली.
या अपघातात शिवराम झुगरे यांच्या नाक-तोंडातून रक्तस्त्राव सुरू होता, तर चंद्रकांत शिद यांच्या बरगडीला दुखापत झाली. याशिवाय नसीमा शेख (26, बुलढाणा), सूरज देहाडे (42, आव्हाटे), सोनाली देहाडे (30), अपेक्षा देहाडे (17), कल्याणी देहाडे (14), दिव्याक्षी देहाडे (12), सिद्धार्थ देहाडे (09), सीता खाडगीर (33), जानकी मानकरी (60), बेबी पारधी (60), बुधी पारधी (65), रुपाली बरफ (13) यांसह अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले.
या मार्गावर बसचालक अनेकदा अति वेगाने वाहन चालवतात, अशी तक्रार प्रवाशांनी व्यक्त केली. सुर्यमाळ, खोडाळा, श्रीघाट आणि देवगांव हे डोंगराळ व नागमोडी वळणाचे भाग असल्याने चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असल्याचे प्रवाशांचे मत आहे.
श्रीघाट–देवगांव या केवळ ३ किमी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून गेल्या ७–८ वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था कायम आहे. या मार्गावर आधीही अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे “रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करावी” अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे. या अपघातानंतर खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






