खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त ( सौजन्य - सोशल मीडिया )
संबंधित आदिवासी खातेदारांचे यापूर्वीचे सोसायटी कर्ज शासनाकडून माफ झाले होते. त्यानंतर २०२४मध्ये पुढील शेतीकामांसाठी नवीन कर्जाची मागणी खातेदारांनी नोंदवली. त्यावेळी सोसायटी कार्यालयात खातेदारांकडून आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि ३० तारखेपर्यंत कर्जाचे वाटप केले जाईल, असा शब्द दिला. मात्र, आदिवासी सेवा सोसायटीचे सचिव विष्णू जोशी यांच्याकडून अद्याप कर्जवाटप झाले नसल्याचा आरोप खातेदारांनी अर्जात केला आहे. वारंवार कार्यालयात चकरा मारूनही कर्ज न मिळाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
ऐन हंगामात हक्काचे कर्ज न मिळाल्याने आदिवासी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. परिणामी, शेतीचा खर्च भागवण्यासाठी काही खातेदारांना घरातील दागिने सावकारांकडे गहाण ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून आदिवासी शेतकऱ्यांना तत्काळ न्याय द्यावा आणि फसवणूक करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
आडोशीचे शेतकरी प्रकाशा गांगुर्डे स्पष्टच म्हणाले की, ‘शेतकऱ्यांनी विश्वासाने सोसायटीकडे मदतीची अपेक्षा केली होती; मात्र, वारंवार मागणी करूनही वाटप न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीचा हंगाम सुरू असताना त्यांना सावकारांकडे हात पसरण्याची वेळ येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी’.
खोडाळाचे उपसरपंच उमेश येलमामे म्हणाले, ‘आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची सोसायटी मिळत नसेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे. ऐन हंगामात आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून खातेदारांना न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई झालीच पाहिजे’.
…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित






