पालिकेच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा? रस्त्यावर गरम मॅस्टिक, पण बॅरिकेड्सचा पत्ता नाही; वसईत स्कूटीवरून घसरून माय-लेकी गंभीर जखमी
निलेश महाडीक, वसई-विरार : वसईमध्ये रस्त्याच्या पॅचवर्कच्या कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात न आल्याने माय-लेकीला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली. पाले रोडवरील दर्ग्याजवळ रस्त्यावर गरम मॅस्टिकचे आवरण टाकण्यात आले होते. मात्र, वाहनचालकांना सावध करण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेड्स, सूचना फलक किंवा अन्य सुरक्षा व्यवस्था नसल्याचा दावा जखमींनी केला आहे.
शनिवार, १९ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ५ वाजता सोनाली नार्झेथ मिर्ची या आपल्या ५८ वर्षीय आई सुशीला मिर्ची यांना डायलेसिससाठी रुग्णालयात घेऊन जात होत्या. वसई किल्ला बंदर येथून स्कूटीने नायगावच्या दिशेने जात असताना पाले रोडवरील दर्ग्याजवळ हा अपघात झाला.
जखमींच्या म्हणण्यानुसार, पहाटेच्या अंधारात रस्त्यावरील गरम मॅस्टिक दिसले नाही. तसेच वाहनचालकांना धोक्याची पूर्वसूचना देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. स्कूटी मॅस्टिकवर गेल्यानंतर तिचे टायर चिकटले आणि टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर सोनाली आणि त्यांच्या आई रस्त्यावर कोसळल्या.
गरम मॅस्टिकवर पडल्याने सोनाली यांच्या हात-पायांना गंभीर भाजले, तर सुशीला मिर्ची यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर दोघींनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुशीला मिर्ची यांच्यावर मिरा रोड येथील रुग्णालयात तीन दिवस उपचार करण्यात आले.
रस्त्याचे पॅचवर्क करताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्स आणि सूचना फलक लावणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराने पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचा आरोप माय-लेकीने केला आहे. या कथित निष्काळजीपणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रस्त्याचे पॅचवर्क किंवा दुरुस्तीची कामे सुरू असताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्स, सूचना फलक तसेच आवश्यक इशारे देणे गरजेचे असते. मात्र, दुर्घटनास्थळी अशा प्रकारची खबरदारी घेण्यात आली नसल्याचा आरोप जखमींनी केला आहे.
पालिकेच्या संबंधित ठेकेदाराच्या कथित निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप माय-लेकीने केला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे रस्त्यांची कामे करताना ठेकेदारांकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे.






