(फोटो- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
पंढरपूर: पंढरपूर हे महाराष्ट्रासह देशातील भक्तांचे अत्यंत जवळचे असे देवस्थान आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशी दिवशी या ठिकाणी भक्तांचा महापूर येतो. पंढरपूरची वारी ही संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. लाखों वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला अनेक किमी अंतर चालत पंढरपूरला येत असतात. आषाढी वारी झाली की वारकऱ्यांना ओढ असते ती म्हणजे कार्तिकी एकादशीची. १२ तारखेला कार्तिकी एकादशी आहे. त्यानिमित्ताने हजारो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान कार्तिकी सोहळ्याला येणाऱ्या भाविकांना पांडुरंगाचे दर्शन मिळावे यासाठी २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.
भाविकांना देवाच्या अखंड दर्शनाचा लाभ होण्यासाठी देवाचे दर्शन २४ तास सुरू राहणार असल्याचे माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिली आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादक्षिसाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. या कालावधीत जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन व्हावे यासाठी २४ तास मंदिर सुरू ठेवले जाणार आहे. यासंदर्भात मंदिर समितीने निर्णय घेतला आहे. कार्तिकी यात्रा संपेपर्यंत मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे.
आषाढी आणि कार्तिकी यात्रेत देवाची निद्रा बंड होत असल्याने परंपरेनुसार, देवाचा पलंग उद्या काढला जाणार आहे. म्हणजे पांडुरंग उद्यापासून २४ तास मंदिरात उभा असणार आहे. चांगला दिवस व मुहूर्त पाहून देवाचा पलंग काढण्याची परंपरा आहे. अखंड दर्शनासाठी उभा असणाऱ्या पांडुरंगाला थकवा जाणवू नये यासाठी देवाच्या मूर्तीमागे मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणी मातेच्या मागे मऊ कापसाचा तक्क्या ठेवला जाणार आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन २४ तास खुले असणार आहे. त्यासाह नित्य पूजा, प्रसाद, अन्य विधीसोडून जवळपास २२ तास भाविकांना देवाचे दर्शन घेता येणार आहे. कार्तिकी यात्रा पूर्ण होताच देवाची प्रक्षाळ पूजा होणार आहे. त्यानंतर देवाचे २४ तास दर्शन बंद केले जाणार आहे. दरम्यान, पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस, महाप्रसाद समर्पित करण्यासाठी देणगी देऊन महाप्रसाद सहभाग योजनेत भाग घेता येतो. त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे. तसेच येणाऱ्या भाविकांना कसलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी देखील मंदिर समितीकडून काळजी घेण्यात येत आहे.