पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आता आता महायुती आणि महाविकास आघाडीला लढत देण्यासाठी परिवर्तन महाशक्ती देखील राज्यात विधानसभा निवडणूक लढणार आहे. संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू असे अनेक नेत्यांनी एकत्रित येऊन परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे राज्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे नेमके कोणाला सरकार स्थापन करायला मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
पुण्यात परिवर्तन महाशक्तीची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी उपस्थित होते. या बैठकीत १५० जागांचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. अनेक जण यांच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील उमेदवार देणार असल्याचे परिवर्तन महाशक्तीने ठरवल्याचे समजते आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमचा संपर्क सुरू असल्याचे परिवर्तन महाशक्तीचे म्हणणे आहे.
सातारा जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार
स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना व कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीमध्ये रणशिंग फुंकले आहे. सर्वसामान्यांच्या विकासाचे प्रश्न घेऊन आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव हे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन सातारा जिल्ह्यात ही तिसरी आघाडी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
महाराष्ट्रातील २२५ घराणी आणि त्या घराण्यातील सदस्य आलटून पालटून राज्याच्या सत्तेत येत राहतात या महायुती आणि महाविकास आघाडी शासनामध्ये माल तोच पॅकिंग मात्र वेगवेगळे अशी परिस्थिती आहे. या दोन्ही आघाड्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे सर्वसामान्य जनतेला सक्षम तिसरा पर्याय देण्याकरता चळवळीतल्या आम्ही नेते वामनराव चटप शंकरराव धोंडगे संभाजीराजे छत्रपती प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आली असून त्यांच्या कोअर कमिटीची बैठक गुरुवारी पुणे येथे होत आहे. या बैठकीत महाराष्ट्रात ज्या ठिकाणी सक्षम आणि स्वच्छ चेहऱ्याचा उमेदवार मिळेल अशा लढवणार असल्याचे सूतोवाच राजू शेट्टी यांनी केले.