PCMC SIR Campaign 2026: भोसरीत बीएलओंना विशेष प्रशिक्षण; ३० जूनपासून घरभेटीद्वारे मतदार पडताळणी
PCMC SIR : भोसरी विधानसभा २०७ मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या तयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि नवनियुक्त सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कालबद्ध कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. प्रगणना पत्रक भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच घरभेटीदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या ६ लाख ३६ हजार ४२४ मतदार असून, मतदार यादीतील मॅपिंगचे प्रमाण ५८.६६ टक्के आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४८३ बीएलओ आणि ४८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओ घरभेटी देऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. यावेळी प्रगणना पत्रके भरून घेण्यात येणार असून, मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित केली जाणार आहे.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले की, मतदार यादी अद्ययावत आणि त्रुटीरहित ठेवण्यासाठी घरभेटींच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे. नागरिकांनी प्रगणना पत्रकातील माहिती काळजीपूर्वक तपासून आवश्यक कागदपत्रांसह बीएलओंना सहकार्य करावे.
प्रगणना पत्रकात अद्ययावत मोबाईल क्रमांक नमूद करावा. कुटुंबातील सदस्यांचे मॅपिंग चुकीचे असल्यास अथवा इतर विसंगती आढळल्यास ती बीएलओंच्या निदर्शनास आणून द्यावी. आवश्यक तेथे संबंधित कागदपत्रे सादर करून विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी सतीश थेटे यांनी केले.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सहाय्यक आयुक्त तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अजिंक्य येळे, परशुराम वाघमोडे तसेच नायब तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी विकी परदेशी उपस्थित होते.






