PCMC News: पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिका वेग घेणार; पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे मोठे निर्णय
PCMC News: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक वाहतूक, जलनिस्सारण व्यवस्था, अग्निसुरक्षा, आरोग्य सेवा, नागरी सुविधा, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम तसेच पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणाशी निगडित कामांना हिरवा कंदील देण्यात आला. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे मेट्रो फेज-१ विस्तार प्रकल्पांतर्गत निगडी येथील अतिरिक्त चौथ्या मेट्रो स्थानकासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीस मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) मार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिस्स्याचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे पिंपरी-निगडी विस्तारित मार्गिकेवरील नागरिकांना अधिक सुलभ आणि व्यापक मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे.
शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दिघी, बोपखेल आणि परिसरातील मलनिस्सारण नलिकांच्या सुधारणा कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच दापोडी पंपिंग स्टेशन ते दापोडी एसटी स्टँडदरम्यानच्या रायझिंग मेन जलनिस्सारण वाहिनीचे उन्नतीकरण करण्यात येणार आहे. मामुर्डी येथील साईनगर उंच जलकुंभाच्या कार्यक्षेत्रात नव्याने विकसित होत असलेल्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामालाही मान्यता देण्यात आली.
शहराच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पुनावळे येथील अग्निशमन केंद्राच्या बांधकामासाठी आवश्यक सुधारित खर्चास मंजुरी देण्यात आली. याशिवाय जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन, प्रशासकीय इमारती आणि अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांतील अग्निशामक यंत्रणांच्या देखभाल, दुरुस्ती व कार्यक्षमतेसाठी आवश्यक कामांनाही मंजुरी देण्यात आली.
नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सोनोग्राफी यंत्रणेच्या दुरुस्ती व देखभालीला मान्यता देण्यात आली. तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील १४ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडील वार्षिक मान्यताप्रक्रियेसाठी आवश्यक शुल्क भरण्यास मंजुरी देण्यात आली.
शैक्षणिक व नागरी सुविधांच्या उन्नतीकरणासाठी प्रभाग क्रमांक १ मधील महापालिका शाळा क्रमांक ९० आणि २१ यांच्या दुरुस्तीच्या कामांना मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील कोयनानगर, मोरया हाऊसिंग सोसायटी आणि सीडीसी परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-आळंदी रस्त्यावरील पावसाळी वाहिन्या व गटारांची साफसफाई आणि दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी स्थायी समितीने विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी दिली आहे. मेट्रो विस्तार, जलनिस्सारण व्यवस्था सक्षमीकरण, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा, रस्ते विकास, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम यांसारख्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आणि विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. मंजूर करण्यात आलेले सर्व प्रकल्प आणि कामे नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणतील,” असे स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले.






