सातारा नगर परिषद निवडणूक रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Local Body Elections : सातारा : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत. तर नगर पंचायत आणि नगर परिषदांचा निकाल येत्या रविवारी (दि.21) हाती येणार आहे. मात्र त्यापूर्वी सातारा नगर परिषद निवडणुकीवर (Local Body Elections) टांगती तलवार आहे. सातारा (Satara News) नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ (ब) साठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार निलेश सुभाष मोरे यांनी दाखल केली असून, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, धमकावणे, हिंसाचार तसेच आदर्श आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनामुळे सदर निवडणूक रद्द ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही याचिका अॅड. तृणाल टोणपे, अॅड. निकिता आनंदाचे, अॅड. गौतम कुलकर्णी, अॅड. अनिरुद्ध रोटे, वैभव राऊत आणि रोहिणी सिदाम यांच्यामार्फत दाखल करण्यात आली असून, याचिकेनुसार, प्रतिवादी विजय शिवाजी देसाई (भाजप उमेदवार) व त्यांच्या समर्थकांच्या कृत्यांमुळे निवडणूक प्रक्रिया प्रभावित झाली. मतदानाच्या दिवशी धंदे प्रशिक्षण केंद्र (ITI) मतदान केंद्र व रिमांड होम मतदान केंद्रासह विविध ठिकाणी मतदार मतदान केंद्रात भाजपचे ‘कमळ’ चिन्ह असलेले चिठ्या बेकायदेशीररीत्या घेऊन जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत याचिकाकर्त्यांच्या मतदान प्रतिनिधींनी वारंवार हरकती घेतल्या असतानाही, अनेक बूथ प्रमुखांनी त्या हरकती नोंदविल्या नाहीत किंवा कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही, असा आरोप आहे.
हे देखील वाचा : सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण; म्हणाले, चुकीच्या पद्धतीने…
याचिकेत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की भाजप समर्थक मतदान केंद्रात मुक्तपणे ये-जा करत होते, तसेच वडापाव, सँडविच, पाण्याच्या बाटल्या यांसारख्या अन्नपदार्थांचे वाटप करत होते. हे सर्व राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदर्श आचारसंहितेचे उघड उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याचिकेत एका गंभीर हिंसाचाराच्या घटनेचाही उल्लेख आहे. याचिकाकर्त्यांचे समर्थक महेश शिवदास यांना रिमांड होम मतदान केंद्राजवळील प्रतिबंधित १०० मीटर परिसरात धमकावण्यात आले, जातीय शिवीगाळ करण्यात आली, मारहाण करण्यात आली आणि सुमारे ४० ते ५० लोकांनी त्यांना घेरल्याचा आरोप आहे, तरीही संबंधित आरोपींविरुद्ध तात्काळ कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
मतदानाच्या दिवशी पोलीस ठाण्यात आंदोलन
याचिकेनुसार, व्हिडिओ पुरावे, वैद्यकीय तपासणी अहवाल, प्रसारमाध्यमांतील बातम्या आणि वारंवार दिलेल्या तक्रारी असूनही, राजकीय दबावामुळे पोलिसांना एफआयआर नोंदविण्यात अपयश आले. मतदानाच्या दिवशी याचिकाकर्ते व त्यांचे समर्थक यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अनेक तास आंदोलन केले, मात्र त्यानंतरही कोणतीही प्रभावी कायदेशीर कारवाई झाली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…
याचिकाकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवरही कर्तव्यात कसूर केल्याचे आरोप केले असून, बूथ प्रमुख व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना बेकायदेशीर कृत्ये थांबविण्यात अपयश आले, पोलिसांची मदत मागविण्यास नकार दिला आणि त्याच दिवशी सादर केलेल्या लेखी तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे नमूद केले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम, १९६५, आदर्श आचारसंहिता अंतर्गत विविध तरतुदींच्या उल्लंघनाचा आधार घेत, प्रभाग क्रमांक ५ (ब) मधील निवडणूक अवैध ठरवून ती रद्द करावी व सदर प्रभागासाठी नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या आगामी सुनावणीकडे राजकीय व कायदेशीर वर्तुळाचे विशेष लक्ष लागलेले आहे.
सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश
याचिकाकर्ते निलेश मोरे यांनी सांगितले की “सदर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी, सातारा यांना पत्र पाठवून घटनेबाबत स्वयं स्पष्ट व सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर प्रकरणाबाबत आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे,” असे याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केले.






