संभाजीनगरमध्ये भाजपचा 'हाऊसफुल्ल' शो! (Photo Credit - X)
८ केबिन, १६ नेते आणि ‘बंडखोरी’ न करण्याचे वचन!
मुलाखतीसाठी येणाऱ्या इच्छुकांची संख्या पाहता भाजपने विशेष व्यवस्था केली आहे. चिकलठाणा कार्यालयात ८ स्वतंत्र केबिनमध्ये १६ ज्येष्ठ नेत्यांमार्फत मुलाखती घेतल्या जात आहेत. उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा वेळ वाचवण्यासाठी महिला व पुरुष उमेदवारांच्या स्वतंत्र याद्या करून एकाच वेळी अनेक मुलाखती घेतल्या जात आहेत. उमेदवारी न मिळाल्यास पक्षाशी प्रतारणा किंवा बंडखोरी करणार नाही, असे लेखी किंवा तोंडी ‘वचन’ही इच्छुकांकडून घेतले जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
उबाठा गटाला मोठे खिंडार; विनायक पांडे यांचा समर्थकांसह प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उबाठा) गटाला शहरात मोठे हादरे बसत आहेत. बेगमपुरा प्रभागातील माजी नगरसेवक विनायक गणू पांडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विनायक पांडे यांच्यासोबत संजय फत्तेलष्कर, नंदकुमार जोशी, विजय सोनटक्के यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी हाती ‘कमळ’ घेतले.
प्रवेशाच्या रांगेमुळे दावेदारांची धाकधूक
शहरात भाजपची वाढती ताकद पाहून इतर पक्षांतील अनेक बडे चेहरे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र, या ‘इनकमिंग’मुळे वर्षानुवर्षे पक्षात काम करणाऱ्या जुन्या दावेदारांमध्ये उमेदवारी मिळण्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती
शुक्रवारी मुलाखतींचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १९ ते २९ मधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील. इच्छुकांनी आपल्या प्राथमिक माहितीपत्रासह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केले आहे. या प्रक्रियेत मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, निवडणूक प्रमुख समीर राजूरकर, अमोल झळके यांसह अनेक पदाधिकारी सक्रिय सहभागी झाले आहेत.






