आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका
मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीही केली जात आहे. असे असताना आता राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचाराला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारपासून विविध ठिकाणी जोरदार प्रचारात सहभागी झाले होते. एकाच दिवशी राज्याच्या विविध भागांत सभा, रोड शो आणि जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारचा कार्यक्रम पूर्णपणे निवडणूक प्रचारावर केंद्रित होता. सकाळी १०.५० वाजता सातारा जिल्ह्यातील फलटण येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगरपरिषद निवडणूक प्रचारसभा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. त्यानंतर दुपारी १२.४० वाजता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे वीर सावरकर मैदान, बाजारतळ येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. दुपारी २.५५ वाजता नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे जि. प. मुलींच्या हायस्कूलच्या परिसरात मुख्यमंत्र्यांनी मतदारांशी संवाद साधला. सायंकाळी ५ वाजता वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आठवडी बाजार चौक, नगरपरिषद समोर प्रचारसभेद्वारे मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराची सांगता केली.
दरम्यान, सायंकाळी पाच वाजता ठाणे जिल्ह्यातील कल्याण (पूर्व) येथे कै. दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आणि त्यात सचिन पोटे यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. सायंकाळी ७ वाजता अंबरनाथ (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपमुख्यमंत्री शिंदे यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती.
सकाळी शिंदेंचा अमरावतीत प्रचारदौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही गुरुवारचा दिवस प्रचार आणि संघटनात्मक हालचालींनी भरलेला होता. सकाळी ११.३० वाजता अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे द्वारका चौक ते संत रुपलाल महाराज मंदिर दरम्यान रोड शोमध्ये एकनाथ शिंदे सहभागी झाले. या रोड शोद्वारे शहरातील मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
समन्वयाने प्रचार केला सुरू
एकीकडे फडणवीस आणि शिंदे हे राज्यभर दौरे करून प्रचाराचा धडाका लावत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वपक्षाच्या आढावा बैठका आणि संघटनात्मक नियोजनात व्यस्त असल्याची माहिती आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी महायुतीकडून समन्वयाने प्रचार सुरू असून येत्या काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
हेदेखील वाचा : BMC Election 2026: मुंबई महापालिकेत ‘धनुष्यबाण’ हाती घेण्यासाठी चढाओढ! २२७ जागांसाठी २७०० हून अधिक महिलांची विक्रमी उपस्थिती






